ऑक्सिजनचा बफर स्टॉक असतानाही जागेअभावी रुग्णांचा जातोय जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:15 IST2021-03-28T04:15:52+5:302021-03-28T04:15:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध व्हावा यासाठी जिल्ह्यात वापरापेक्षा अधिक साठा ...

ऑक्सिजनचा बफर स्टॉक असतानाही जागेअभावी रुग्णांचा जातोय जीव
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध व्हावा यासाठी जिल्ह्यात वापरापेक्षा अधिक साठा शिल्लक असून केवळ जागेअभावी रुग्णांना जीव गमवावा लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. शनिवारी २४ तासात ३४.१ मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर झाला तरीदेखील या वापराच्या तुलनेत अधिक म्हणजेच ४९.८ मेट्रिक टन आॉक्सिजनचा साठा जिल्ह्यात शिल्लक आहे.
गेल्या एक ते दीड महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला असून दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या समोर येत आहे. यात गेल्या वर्षाच्या तुलनेत सध्या गंभीर रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत असून मृत्यूदेखील दररोज वाढत आहे. त्यामुळे ही वाढती रुग्ण संख्या पाहता त्यांना ऑक्सिजन उपलब्ध व्हावा यासाठी नियोजन केले जात आहे. मात्र आज जिल्ह्यातील उपलब्ध खाटांच्या संख्येच्या तुलनेत अधिक रुग्ण संख्या समोर येत असल्याने रुग्णांना दाखल करून घेण्यास व आवश्यक त्या रुग्णांना ऑक्सिजन लावण्यास अडचणी येत असल्याचे समोर येत आहे. याचाच एक भाग म्हणजे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. या रुग्णालयाची खाटांची क्षमता १०० असून या ठिकाणी १४८ जण दाखल होते.
रुग्णालयाच्या क्षमतेनुसार ऑक्सिजन पुरवठा
जिल्ह्यात वैद्यकीय उपचारासाठी ऑक्सिजनचा वापर पाहता दर दररोज साधारण तीन हजार ६०० ऑक्सीजन सिलेंडर जिल्ह्यासाठी लागतात. यामध्ये त्या त्या रूग्णालयाच्या क्षमतेनुसार हे रुग्णालय ऑक्सिजनची मागणी करतात. यात त्यांच्याकडे असलेले सिलिंडर जेवढे आहे तेवढे रिफलिंग करून मिळतात. मात्र सध्या रुग्ण संख्या वाढत असल्याने अधिकचे रुग्ण दाखल होत असून सिलिंडरच्या क्षमतेपेक्षा जास्त सिलिंडर त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यास ऑक्सिजनची समस्या निर्माण होऊ शकते. मात्र असे असले तरी वाढीव मागणी झाल्यास त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल एवढा साठा शिल्लक आहे. यात खाटांची उपलब्धता हा महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे.
वापरापेक्षा दीडपट साठा शिल्लक
चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील घटनेनंतर ऑक्सिजनच्या उपलब्धते विषयी प्रश्न उपस्थित झाला असता लोकमतने या विषयी माहिती जाणून घेतली. यात जिल्ह्यात शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासात ३४.१ मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर झाला होता. मात्र तरीदेखील ४९.८ मेट्रिक टन ऑक्सिजनसाठा जिल्ह्यात शिल्लक आहे. यात ३० मेट्रिक टन एक टँकर मागविण्यात आला असून त्यातून दोन ठिकाणी प्रत्येकी १५-१५ मेट्रिक टन साठा उपलब्ध करून देण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही अफवा पसरवू नये. यामुळे आवश्यक त्या उपाययोजना थांबून संपूर्ण यंत्रणा अफवांच्या दिशेने धावते. चोपडा येथील घटने विषयी देखील अफवा पसरविणे चुकीचे आहे.
- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी
जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचा मागणीपेक्षा अधिक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे कोठेही ऑक्सिजनची कमतरता नसून प्रत्येकाच्या मागणीनुसार वेळेवर ऑक्सिजन साठा पुरविला जात आहे. इतकेच नव्हे जळगाव जिल्ह्यातून धुळे, नंदुरबार, बुलढाणा येथे मागणी झाली तरी तेथेही ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे.
- अनिल माणिकराव, नोडल अधिकारी, ऑक्सिजन पुरवठा.