पोलिसात फिर्याद देण्यावरुन डेप्युटी आरटीओ, निरीक्षकात कलगीतुरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:56 IST2021-02-05T05:56:51+5:302021-02-05T05:56:51+5:30

जळगाव : आरटीओच्या शिबिरात डमी उमेदवार उभा करुन थेट पक्के लायसन्स मिळविल्याचे प्रकरण उघडकीस आले असून याप्रकरणी पोलिसात फिर्याद ...

Deputy RTO, Inspector Kalgitura for filing a complaint with the police! | पोलिसात फिर्याद देण्यावरुन डेप्युटी आरटीओ, निरीक्षकात कलगीतुरा !

पोलिसात फिर्याद देण्यावरुन डेप्युटी आरटीओ, निरीक्षकात कलगीतुरा !

जळगाव : आरटीओच्या शिबिरात डमी उमेदवार उभा करुन थेट पक्के लायसन्स मिळविल्याचे प्रकरण उघडकीस आले असून याप्रकरणी पोलिसात फिर्याद कुणी द्यावी, यावरुन डेप्युटी आरटीओ श्याम लोही व मोटार वाहन निरीक्षक गणेश पाटील यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. गुन्हा दाखलचे आदेश होऊन १७ दिवस उलटले आहेत. दुसरीकडे फिर्याद,जबाब व पुरावे द्यायला अद्याप कोणीही पुढे आले नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

भुसावळ येथे घेण्यात आलेल्या आरटीओच्या शिबिरात डमी उमेदवार उभा करुन अर्जावर दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो चिपकवून लायसन्स काढण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हा मोटार वाहन निरीक्षक घनश्याम चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आताही तसाच प्रकार उघडकीस आल्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी गणेश पाटील यांना गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद देण्याचे आदेश देऊन कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी खुलासा मागिविला आहे.

निरीक्षकांच्या खुलाश्यात लोहींवर ठपका

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश पाटील यांनी खुलासा सादर केलेला असून त्यात म्हटले आहे की, आपण आपल्या स्तरावर निष्कर्ष काढलेला आहे. त्यापूर्वी माझ्याकडे विचारणा किंवा शहानिशा केलेली नाही. फॉर्म क्र.४ हा ऑनलाईन भरण्यात आलेला असून त्यावरील उमेदवाराच्या सिस्टीम जनरेटेड फोटोवर कोणीतरी नंतर दुसरा फोटो चिटकविलेला असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. लायसन्सधारक कैलास ब्रिजलाल छाबडा या उमेदवाराने २९ ऑक्टोबर २०२० रोजी भुसावळ येथील शिबिरात सादर केलेला फॉर्म क्र.४, त्यावरील सिस्टीम जनरेटेड उमेदवाराचा फोटो आणि प्रत्यक्ष उमेदवार एकच असल्याची खात्री केल्यावरच उमेदवाराची ड्रायव्हींग चाचणी घेतली आहे. त्यात उमेदवार पास झाल्यनंतर तसा शेरा मारुन पुढील कार्यवाहीसाठी आरटीओ कार्यालयात फॉर्म क्र.४ सादर केलेला आहे. तो तपासल्यानंतरच स्वत: लोही यांनी लायसन्स जारी करण्याचे आदेश देऊन स्वाक्षरी केलेली आहे.याप्रकरणी आपली किंवा शासनाची कोणतीही फसवणूक झालेली नसल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. लायसन्स वितरित झाल्यानंतर छाबडा यांच्या सिस्टीम जनरेटेडमुळे फोटोवर अन्य व्यक्तीचा फोटो कोणीतरी खोडसाळपणे चिकटविल्याचे दिसून असल्याचे म्हटले आहे.

ज्याच्या लक्षात आले त्यानेच फिर्याद द्यावी

हा प्रकार ज्या लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला आहे, त्यांनीच पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करणे आवश्यक असून तेव्हाच तपासात सत्य बाहेर येईल, तरीही लोही यांच्या आदेशानुसार आवश्यक ती सर्व कागदपत्रे पोलिसांना दिली आहेत,असेही निरीक्षक गणेश पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणात निष्पक्ष चौकशी होणे अपेक्षित आहे. कार्यालयातील असो की शिबिरात जो कोणी दोषी असेल त्यांना सहआरोपी करावे अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

कोट...

निरीक्षक गणेश पाटील यांचा खुलासा प्राप्त झालेला आहे. आपल्या आदेशाचे पत्र त्यांनी पोलिसांना दिले आहे, परंतु शिबिरात त्यांची ड्युटी होती, त्यामुळे त्यांनीच फिर्याद देणे अपेक्षित आहे.

-श्याम लोही, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: Deputy RTO, Inspector Kalgitura for filing a complaint with the police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.