कमी किमतीत ठेवी घेतल्या, मात्र ठेवीदार कोण माहिती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:12 AM2021-06-23T04:12:55+5:302021-06-23T04:12:55+5:30

जळगाव : ठेवीदार आपल्याकडे यायचे, त्या आपण कमी किमतीत घेतल्या, मात्र ते ठेवीदार कोण व कुठले, हे आम्हाला माहिती ...

Deposits were made at low prices, but the depositors did not know who they were | कमी किमतीत ठेवी घेतल्या, मात्र ठेवीदार कोण माहिती नाही

कमी किमतीत ठेवी घेतल्या, मात्र ठेवीदार कोण माहिती नाही

Next

जळगाव : ठेवीदार आपल्याकडे यायचे, त्या आपण कमी किमतीत घेतल्या, मात्र ते ठेवीदार कोण व कुठले, हे आम्हाला माहिती नाही. काही प्रकरणात एजंटच अशा ठेवी घेऊन येत असत. त्यांना आपण रोख पैसे दिलेले आहेत. बनावट कागदपत्रे कोणी तयार केली, हे देखील आम्हाला माहिती नाही, असे अटकेतील संशयितांनी तपासात सांगितले आहे. काही एजंटांची नावे त्यांनी सांगितली, तर काहींची नावे सांगणे टाळले आहे. दरम्यान, अटकेतील संशयितांची मंगळवारी न्यायालयाने कारागृहात रवानगी केली.

बीएचआर फसवणूक व अपहार प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने भागवत गणपत भंगाळे (रा. जिल्हा पेठ, जळगाव), प्रेम रामनारायण कोगटा (रा. एमआयडीसी जळगाव), जयश्री शैलेश मणियार (पाळधी, ता. धरणगाव), संजय भगवानदास तोतला (रा. शाहू नगर, जळगाव), छगन श्यामराव झाल्टे, जितेंद्र रमेश पाटील, राजेश शांतिलाल लोढा (सर्व रा. जामनेर), आसिफ मुन्ना तेली (रा. भुसावळ), प्रीतेश चंपालाल जैन (रा. धुळे), अंबादास आबाजी मानकापे (रा. औरंगाबाद) व जयश्री अंतिम तोतला ( रा. मुंबई, मूळ रा. जळगाव) या ११ जणांना १७ जून रोजी अटक केली होती. मंगळवारी त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पुणे विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी बाजू मांडली.

जयश्री तोतला म्हणतात, कर्जाबाबत माहिती नाही; पतीनेच व्यवहार केला

पोलीस कोठडीत तपासात प्रेम कोगटा यांनी ठेवी आपल्या कर्जात वर्ग करण्याकरिता बीएचआरमधील अधिकारी, कर्मचारी यांनी मदत केली आहे, परंतु नावे सांगितली नाहीत. जयश्री तोतला यांनी तर कर्जाबाबत आपल्याला काहीच माहिती नाही, पती अंतिम तोतला यांनीच सर्व व्यवहार केला आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे अंतिम तोतला यांचीही चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

भागवत भंगाळेंना अशोक सेन नावाच्या व्यक्तीने केली मदत

भागवत भंगाळे यांनी, आपल्याला अशोक सेन नावाच्या व्यक्तीने कागदपत्रे तयार करण्यासाठी मदत केल्याचे तपासात सांगितले आहे. एजंटांची नावे सांगायला मात्र त्यांनी नकार दिला. छगन झाल्टे यांनी, मला फक्त एकाच कर्जाबाबत माहिती आहे, दुसऱ्या कर्जाची माहिती नाही, असे स्पष्ट केले. जितेंद्र पाटील याने, आपण जितेंद्र कंडारे व सुनील झंवर या दोघांना ओळखतो, कंडारे याच्याकडून रोज वेगवेगळे एजंट चिठ्ठ्‌या घेऊन येत होते, असे तपासात सांगितले आहे. आसिफ मुन्ना तेली याने, एजंट अजय ललवाणी याने ठेवी मॅच करण्यासाठी मदत केल्याचे सांगितले. जयश्री मणियार या, बनावट कागदपत्रे कोणी तयार केले माहिती नाही, परंतु सह्या करून ही कागदपत्रे योगेश मालपाणी याच्याकडे दिल्याचे सांगत आहेत. संजय तोतला याने तर जितेंद्र कंडारे, सुजित वाणी व बीएचआरमध्ये काम करणारा सोनवणे याच्या मदतीने कर्ज निरंक केल्याचे सांगून अधिक माहिती दिलेली नाही. राजेश लोढा याने, आपण स्वत:च ठेवीदारांकडून मूळ पावत्या घेऊन त्याची कागदपत्रे बनविली व त्यासाठी कंडारेने मदत केल्याचे मान्य केले.

हे एजंट आले रडारवर...

तपासात अटकेतील संशयितांनी अनिल पगारिया, संतोष बाफना, अजय ललवाणी, उदयकुमार कांकरिया, रमेश जैन, अजय जैन, अशोक रुणवाल, शिरीष कुवाड, अतुल गांधी व वसंत चव्हाण आदी एजंटांची नावे सांगितलेली आहेत. त्यामुळे हे एजंटही पोलिसांच्या रडारवर आले आहेत. सुनील झंवर याच्याशी आपला कोणताच आर्थिक व्यवहार झालेला नसल्याचे अटकेतील संशयितांनी सांगितले आहे, मात्र झंवर याच्या कार्यालयात निरंक दाखले, कर्जदारांच्या याद्या व इतर कागदपत्रे आढळून आलेली आहेत. दरम्यान, घेतलेल्या कर्जाचा वापर कशासाठी केला, याची चौकशी केली जाणार आहे.

Web Title: Deposits were made at low prices, but the depositors did not know who they were

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app