हार्ड डिस्कसाठी ठेवीदार संघटनेचे पोलिसांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:23 IST2021-08-18T04:23:01+5:302021-08-18T04:23:01+5:30
जळगाव : बीएचआर पतसंस्थेच्या कर्जदारांनी कर्ज भरायला सुरुवात केल्याने ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत, तर दुसरीकडे पोलिसांकडून हार्ड डिस्क ...

हार्ड डिस्कसाठी ठेवीदार संघटनेचे पोलिसांना साकडे
जळगाव : बीएचआर पतसंस्थेच्या कर्जदारांनी कर्ज भरायला सुरुवात केल्याने ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत, तर दुसरीकडे पोलिसांकडून हार्ड डिस्क अद्यापही न मिळाल्याने हिशेबाचा ताळमेळच जुळत नाही, त्यामुळे कर्जदार, ठेवीदार व अवसायक यांची चिंता वाढली आहे. ही हार्ड डिस्क मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघर्ष समितीने मंगळवारी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांना पत्राद्वारे साकडे घातले आहे.
पावत्या मॅचिंग करून काही बड्या कर्जदारांनी दलालामार्फत ठेवीदारांना वेठीस धरुन कमी रकमा दिल्या होत्या. आता पोलीस कारवायामुळे किंवा कारवाईच्या भीतीने अनेकांनी न्यायालयात व परस्पर ठेवीदारांना पैसे भरण्याची तयारी दर्शविली आहे. आपली बुडालेली रक्कम परत मिळणारच नाही, असा ठाम विश्वास निर्माण झालेल्या ठेवीदारांना आता पूर्ण रकमा मिळू लागल्या आहेत तर काही जणांना यापुढील काळात मिळणार आहे. जे कर्जदार बीएचआर पतसंस्थेत कर्ज भरायला येत आहेत, त्यांना त्यांचा हिशेबच दाखविता येत नाही. त्यामुळे अवसायकांपुढे मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. ठेवी, कर्ज, थकबाकी यांसह संपूर्ण आर्थिक व्यवहाराची माहिती पोलिसांनी जप्त केलेल्या हार्ड डिस्कमध्ये आहे. त्यामुळे संस्थेचे नियमित कामकाज सुरू करण्यासाठी ही हार्ड डिस्क मिळावी, अशी विनंती समितीचे कार्याध्यक्ष अशोक मंडोरे व उपाध्यक्ष गिरधर डाभी यांनी पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्याकडे केली आहे.
तपासाधिकाऱ्यांची बदली
डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुचेता खोकले यांच्याकडे आहे. सोमवारी त्यांची दहशतवादी विरोधी पथकात बदली झाली आहे. खोकले यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. गुन्ह्याचा तपास योग्य दिशेने सुरू असून, ठेवीदारांना न्याय मिळत असल्याने बदली स्थगितीसाठी ठेवीदारांसह अनेकांकडून प्रयत्न केले जात आहेत. बदली झाल्याच्या वृत्तास खोकले यांनी दुजोरा दिला.