डेंग्यूने घेतला आणखी एक बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:17 IST2021-09-03T04:17:59+5:302021-09-03T04:17:59+5:30
भुसावळ : शहर आणि तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण वाढतच असून तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांत डेंग्यूने दुसरा बळी घेतला आहे. ३१ ...

डेंग्यूने घेतला आणखी एक बळी
भुसावळ : शहर आणि तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण वाढतच असून तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांत डेंग्यूने दुसरा बळी घेतला आहे. ३१ ऑगस्ट रोजी भुसावळ येथील सिंधी कॉलनीतील सुनीलकुमार बठेचा या २१ वर्षीय तरुणाचा डेंग्यूने बळी घेतला. यानंतर साकेगाव येथील चार वर्षीय बालिकेचा गुरुवारी उपचार घेताना मृत्यू झाला.
शहराजवळील साकेगाव येथील अशीरा अमीन पटेल या चार वर्षीय चिमुकलीस डेंग्यूची बाधा झाल्याने तिच्यावर भुसावळ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आई वारल्यानंतर सांभाळ करणाऱ्या आजोबा व आजीवर या चिमुकल्याच्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गावामध्ये यापूर्वीदेखील मोठ्या प्रमाणात डेंग्यू रुग्ण आढळले असून काही रुग्णांवर उपचार सुरू आहे.
अशीरा पटेल या चिमुकलीच्या आईचा तीन वर्षांपूर्वी एका दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला होता. १२ वर्षांच्या भावासह अशीराचे पालन-पोषण आजी-आजोबा करत होते, गेल्या पाच दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्यानंतर भुसावळ येथील एका खासगी रुग्णालयात अशीरावर उपचार सुरू होते. बुधवारी रात्री अचानक अशीराची तब्येत जास्तच बिघडली व पुढील उपचारार्थ दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच तिची प्राणज्योत मालवली.
गावामध्ये सरपंच पती विष्णू सोनवणे यांच्यासह अनेकांना डेंग्यूची लागण झाली, तर अजूनही काहींवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभाग सतर्क झाला असून गावात वेळोवेळी सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.