कजगावात आरोग्य खात्याकडून डेंग्यू सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST2021-07-21T04:13:02+5:302021-07-21T04:13:02+5:30
कजगाव, ता. भडगाव : येथील स्टेशनरोड परिसरात डेंग्यूचे दोन रुग्ण व जीन भागातील चार रुग्ण असे सहा डेंग्यू रुग्ण ...

कजगावात आरोग्य खात्याकडून डेंग्यू सर्वेक्षण
कजगाव, ता. भडगाव : येथील स्टेशनरोड परिसरात डेंग्यूचे दोन रुग्ण व जीन भागातील चार रुग्ण असे सहा डेंग्यू रुग्ण आढळल्याने कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांत साडेसातशे घराचे सर्वेक्षण केले. डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने ग्रामस्थांत घबराट पसरली आहे. या गावात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. एस. पोटोडे यांनी, तर दि. १९ रोजी जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी कजगाव येथे भेट देऊन डेंग्यूसंदर्भात माहिती जाणून घेतली.
स्टेशनरोडवरील रहिवासी माजी ग्रामपंचायत सदस्य हाजी शफी मण्यार यांचे नात व नातू अली मोसिम मण्यार (७), रिदा मोसीम मण्यार (१०) तसेच नागदरोडवरील जीन भागातील तेजस्विनी ईश्वर हिरे (८) जागृती भोई (११), वंदना पाटील (३२), अतुल ज्ञानेश्वर हिरे (२०) असे सहा रुग्ण डेंग्यूबाधित निघाल्याने त्यांना चाळीसगाव व कजगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
ही माहिती कजगाव आरोग्य खात्यास मिळताच दि. १७पासून सर्वेक्षण सुरू केले. दि. १७ व १८ रोजी दोन दिवसांत साडेसातशे घराचे अंदाजे तीन हजार नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले यात दोन तापाचे रुग्ण आढळून आले. त्यांना तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलविण्यात आले आहे. कजगावात सर्वेक्षणचे काम आरोग्य पथकामार्फत सुरू आहे.
दरम्यान, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. एस. पोटोडे यांनी, तर दि. १९ रोजी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अर्पणा पाटील यांनी कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन माहिती जाणून घेतली. दि. १८ कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील व आरोग्य कर्मचारी पथकाने सर्वेक्षण केले.
ग्रामपंचायतीकडून फवारणी
डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याने कजगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावात तत्काळ औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे.
200721\20jal_10_20072021_12.jpg
गावात डेंग्यू रुग्ण आढळलेल्या भागाची पाहणी करताना डॉ.अपर्णा पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचिता आकडे यांच्यासह आरोग्य कर्मचारी.