एस.टी.च्या आगारात डेंग्यूचा बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:20 IST2021-09-22T04:20:46+5:302021-09-22T04:20:46+5:30
रिॲलिटी चेक लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संख्येने डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. जळगाव आगार प्रशासनातर्फे ...

एस.टी.च्या आगारात डेंग्यूचा बाजार
रिॲलिटी चेक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संख्येने डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. जळगाव आगार प्रशासनातर्फे ऐन डेंग्यूच्या साथीत आगारातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. आगारातील कार्यशाळेच्या आवारात पडलेल्या अनेक रिकाम्या टायरमध्ये पाणी साचल्याने, डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढत आहे.
एस.टी.महामंडळाची नेरी नाका येथे मुुख्य कार्यशाळा आहे. जळगाव आगारातही बसची दुरुस्ती केली जाते; मात्र बसचे बदललेले टायर हे तिथेच पडून असल्यामुळे या टायरमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच हे पाणी साचले असून, यामुळे सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. टायरातील या पाण्यामुळे कर्मचाऱ्यांसह परिसरातील रहिवाशांना डेंग्यूची लागण होण्याची शक्यता आहे. याबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीने आगारप्रमुख नीलेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कार्यशाळेत ठेवण्यात आलेले टायर हे वापरण्यायोग्य टायर आहेत. तर वापरात नसलेले टायर दुसरीकडे ठेवले आहेत. तसेच आगारात नेहमी साथीचे आजार पसरू नये, यासाठी जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात येत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.