रस्ता सुरक्षेचे धडे देणाऱ्या आरटीओंच्या दारातच बेशिस्तीचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:56 IST2021-02-05T05:56:25+5:302021-02-05T05:56:25+5:30
जळगाव : ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान...स्वत: मात्र,..’अशी परिस्थिती सध्या आरटीओ कार्यालयाची झाली आहे. रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाच्या निमित्ताने वाहनधारक व ...

रस्ता सुरक्षेचे धडे देणाऱ्या आरटीओंच्या दारातच बेशिस्तीचे प्रदर्शन
जळगाव : ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान...स्वत: मात्र,..’अशी परिस्थिती सध्या आरटीओ कार्यालयाची झाली आहे. रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाच्या निमित्ताने वाहनधारक व जनतेला शिस्तीचे धडे देत असलेल्या आरटीओ कार्यालयाच्या आत व बाहेर बेशिस्तीचे प्रदर्शन घडत आहे. ठिकठिकाणी एजंटांची थाटलेले दुकाने व त्यांच्या भोवती ग्राहकांचा विळखा यात कार्यालयच हरविल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे आरटीओ अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत बेशिस्तपणे वाहने पार्कींग केली जात असल्याचे ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणी दरम्यान आढळून आले.
आरटीओ कार्यालयाच्यावतीने सध्या रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान राबविले जात आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांच्या उपस्थित या अभियानाचे उद्घाटन गेल्या आठवड्यात झाले. यावेळी वाहनधारकांनी वाहन चालविताना अपघात टाळण्यासाठी काय काळजी, खबरदारी घ्यावी, हॉर्न, सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग, सीटबेल्ट व हेल्मेटचा वापर यासह इतर विषयांवर प्रबोधन करण्यात आले. मात्र हे उपदेशाचे डोस पाजत असतानाच आपल्याच दाराशी काय अवस्था आहे, याचा मात्र आरटीओच्या अधिकाऱ्यांना विसर पडल्याचे दिसून आले. स्वत: किंवा कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून देखील नियमांचे पालन होताना दिसत नाही.
रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी बेशिस्त पार्कींग
आरटीओ कार्यालयात प्रवेश करण्याच्या आधीच बेशिस्त पार्कींगचे प्रदर्शन घडते. काव्यरत्नावली चौक व डी मार्ट या दोन्ही बाजुंनी येणाऱ्या रस्त्याला लागूनच एजंटांनी दुकाने थाटली असून त्यांची स्वत:ची तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांकडून रस्त्याला लागूनच वाहन पार्कींग केली जात आहे. अगदी मुख्य प्रवेशद्वाराला देखील विळखा घालण्यात आलेला आहे. रस्त्यावरुन वापरणाऱ्या वाहनधारकांना हा रस्ता येथे मोकळा दिसतच नाही. याही पुढे जावून कार्यालयाच्या आवारात देखील शिकाऊ परवाना काढण्याच्या खोलीबाहेर, परवाना चाचणी देतानाची जागा व मुख्य इमारतीत अधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाहेर देखील बेशिस्तपणे वाहन पार्कींग केलेली दिसून आली.
एजंटबाबत पक्षपाती धोरण
कार्यालयाच्या आवारात एकही एजंट नको म्हणून तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी सर्व एजंटांना बाहेर काढले होते. बाहेर व्यवसाय करताना रहदारीस अडथळा होणार नाही, याची खबरदारी घेण्याबाबत तंबीही त्यांनी दिली होती. जोपर्यंत पाटील कार्यरत होते, तोपर्यंत एजंटांनाही शिस्त लागली होती. आता मात्र तोंडे बघून भूमिका घेतली जात आहे. काही एजंट आवाराच्या बाहेर तर काही एजंट तर थेट आवारात व इमारतीतच दिसून येतात, त्यामुळे त्यांचीही वाहने आतमध्येच पार्कींग केली जातात. पक्षपाती धोरणाबाबतही नाराजीचा सूर उमटत आहे.