अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:21 IST2021-09-04T04:21:07+5:302021-09-04T04:21:07+5:30
मुक्ताईनगर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी प्रलंबित मागण्या मंजूर करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री महिला व ...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या !
मुक्ताईनगर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी प्रलंबित मागण्या मंजूर करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री महिला व बाल विकास स्मृती ईराणी यांच्याकडे पाठपुरावा करणे तसेच त्यांच्याशी शिष्टमंडळाची भेट घडवून आणण्याबाबत खासदार रक्षा खडसे यांना राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
अशा आहेत मागण्या
अंगणवाडी केंद्राच्या कामकाजासाठी विकसित केलेले पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन सदोष असून त्यात प्रादेशिक भाषेची व्यवस्था असावी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे कार्यरत असतांना अकाली निधन झाल्यास त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अनुकंपा तत्त्वानुसार पात्र वारसांना थेट सामावून घ्यावे. तसेच देशातील मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करून मिनी अंगणवाडी सेविकांना थेट सेविका म्हणून पदोन्नती द्यावी. यांच्यासह देशातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे दररोजचे काम ८ तास मोजून त्यांना शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, भत्ते व सेवेचे फायदे मिळावे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार सेवाशर्ती लागू करण्यात याव्या, अशा मागण्याचे निवेदन खासदार रक्षा खडसे यांना दिले.
याप्रसंगी खडसे यांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या सर्व मागण्यांची सविस्तर माहिती घेऊन लवकरच दिल्लीला तसेच राज्यसरकारकडे याबाबत पाठपुरावा करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.