४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 22:21 IST2019-09-17T20:54:24+5:302019-09-17T22:21:24+5:30
पारोळा पालिकेची सभा : २३ विषयांना मंजुरी

४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी
पारोळा : येथील नगरपालिकेची विशेष सभा पालिका सभागृहात पार पडली. यावेळी नव्याने अग्निशमन गाडी खरेदीसह डेंग्यू आजाराची लागण व कमी दिवसांत पाणी पुरवठा करणे या विषयांवर चर्चा झाली.
मंगळवारी सकाळी ११ वाजता उपनगराध्यक्ष मंगेश तांबे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यात २३ विषयांना मंजुरी दिली. नव्याने अग्निशमन गाडी खरेदी करण्याच्या विषयावर चर्चा होऊन नगरसेवक नितीन सोनार, आरोग्य सभापती दीपक अनुष्ठान यांनी उपाययोजना सुचविल्या. नगरसेवक रोहन मोरे यांनी शहरात डेंग्यूची साथ जोरात सुरू असून त्यावर उपाययोजना करून स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. शहराला ४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा करावा, अशी सूचना मांडली. पाणी पुरवठा सभापती मनिष पाटील यांनी दोन ते तीन दिवसापूर्वीच सहा दिवसाआड पाणी पुरवठा करण्याबाबत सूचना केल्या होत्या. नगरसेवक अशोक चौधरी यांनी त्यांच्या प्रभागात साधे खड्डेही बुजविले जात नसल्याची खंत व्यक्त केली. बालाजी संस्थानचे कार्याध्यक्ष रावसाहेब भोसले यांनी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वहन रथाच्या मार्गावरील खड्डे बुजवून अतिक्रमणही काढण्यात यावे, अशी सूचना मांडली. मुख्याधिकारी डॉ.विजयकुमार मुंडे यांनी याबाबत तत्काळ दखल घेणार असल्याचे सांगितले.
सार्वजनिक शौचालये बांधणे, नवीन गटारी व्यंकटेश पार्क येथे नवीन साहित्य खेळणी घेणे, खुल्या जागेत सामाजिक सभागृह बांधणे, पंप आॅपरेटरची नियुक्ती करणे, अग्निशमन गाडीचालक पदाची भरती करणे, बालाजी यात्रा महोत्सवावेळी महिलांसाठी रांगोळी स्पर्धा राबविणे या विषयांना मंजुरी देण्यात आली.