स्टेशन समोर पुन्हा थाटले अतिक्रमण
जळगाव : अनलॉकनंतर बाजारपेठा उघडल्याने रेल्वे स्टेशन समोर पुन्हा पूर्वीप्रमाणे विविध प्रकारच्या विक्रेत्यांकडून अतिक्रमण थाटायला सुरूवात झाली आहे. यामुळे स्टेशनमध्ये जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी यामुळे वादाचे प्रकार घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, मनपा अतिक्रमण विभागाने पुन्हा या ठिकाणी कारवाई मोहीम राबविण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
दाणा बाजारातील पाणपोई सुरू करण्याची मागणी
जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून दाणा बाजारातील मनपाची पाणपोई अद्याप बंदच आहे. यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची व दाणा बाजारात काम करणाऱ्या हमाल बांधवांची गैरसोय होत आहे. तरी मनपा प्रशासनाने आता कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यानंतर, पुन्हा पाणपोई सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
उद्याने सुरू करण्याची मागणी
जळगाव : अनलॉकनंतर गेल्या महिनाभरापासून सर्व बाजारपेठा व उद्योग-व्यवसाय सुरू झाले असून, नागरिकांची खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे; मात्र गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली शहरातील उद्याने अद्यापही सुरू न झाल्याने, नागरिकांची चांगलीच गैरसोय होत असून, आरोग्यावरही परिणाम होत आहे. तरी जिल्हा प्रशासनाने अनलॉक नंतर शहरातील उद्यानेही सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
मालधक्का परिसरात गस्त वाढविण्याची मागणी
जळगाव : रेल्वेच्या मालधक्का परिसरात उभे असलेल्या मालगाडीतून दोन दिवसांपूर्वी खताच्या गोण्या लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला असून, यापूर्वीही अनेकदा धान्याच्या गोण्या चोरीला गेल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे मालगाडीने बाहेर माल आणणाऱ्या व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तरी रेल्वे पोलिसांनी या घटनांना आळा घालण्यासाठी मालधक्का परिसरात रात्रीच्या वेळी अधिक गस्त वाढविण्याची मागणी व्यापाऱ्यांमधून केली जात आहे.