पेंटिंग बोर्डची मागणी घटली; पेंटर बेरोजगार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:20 IST2021-09-15T04:20:25+5:302021-09-15T04:20:25+5:30
वासेफ पटेल लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रम, लग्न समारंभ आदीप्रसंगी पेंटिंग बोर्ड बनविण्याची प्रथा सध्याच्या ...

पेंटिंग बोर्डची मागणी घटली; पेंटर बेरोजगार!
वासेफ पटेल
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रम, लग्न समारंभ आदीप्रसंगी पेंटिंग बोर्ड बनविण्याची प्रथा सध्याच्या डिजिटल युगात मोडीत निघत आहे. शहरातील बाजारपेठेमध्ये मागील अनेक वर्षांपासून पेंटिंग व्यवसायाचे काम करणारे, पेंटिंग कलेवर उदरनिर्वाह करणाऱ्या अनेकांवर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने अनेक घटकांना मदतीचा हात दिला असला तरी पेंटर मात्र अजूनही मदतीपासून वंचित आहेत.
बाजारपेठेत अनेकांनी पेंटिंग व्यवसाय सुरू केला होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून डिजिटल युग आल्याने पेंटिंग बोर्डची मागणी घटली आहे.
शहरात पेंटिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू होता व पेंटरनासुद्धा व्यवसाय करण्यास परवडत होते. मात्र, डिजिटल फलक, बॅनर, फ्लेक्स आल्यामुळे पेंटिंग व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातूनच काम मिळाले तरी कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे पेंटिंगचा व्यवसाय सोडून दुसरे काम हाती घेणाऱ्यांची संख्या ९५ टक्के असल्याचे विदारक चित्र प्रभाकर जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडले. पेंटरांनाही शासनाने मदत देण्याची गरज आहे.
कोरोनाचाही बसला फटका
पेंटिंग करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याने शहरातील अनेक पेंटर हे दुसऱ्या व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत. तसेच मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमध्ये पेंटिंगची मागणी घटली आहे.
पुन्हा ‘अच्छे दिन’ची आशा
डिजिटल बोर्ड आकर्षक व स्वस्त असले तरी त्यांचे आयुष्य कमी आहे. पेंटर जे बोर्ड हाताने रेखाटतात ते चिरकाल टिकून राहतात. मात्र, लोकांना हे कळत नाही. आज ना उद्या लोकांना हे कळेल आणि पुन्हा आमच्या व्यवसायाला सोन्याचे दिवस येतील, असा विश्वास पेंटरनी व्यक्त केला.