पारोळा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:20 IST2021-09-14T04:20:16+5:302021-09-14T04:20:16+5:30
सुरुवातीला जेमतेम पाऊस झाला. कापूस लागवड झाली, पेरणी झाली. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु पावसाने हुलकावणी देणे काही थांबवले ...

पारोळा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
सुरुवातीला जेमतेम पाऊस झाला. कापूस लागवड झाली, पेरणी झाली. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु पावसाने हुलकावणी देणे काही थांबवले नाही. जवळपास १५ ऑगस्टपर्यंत खंड पडला. परिणामी पिकांची वाढ खुंटली. जवळपास सर्वच पिकांच्या उत्पादनामध्ये घट होईल, असे चित्र दिसत होते. जेमतेम या कोरड्या दुष्काळाच्या खाईतून शेतकरी बाहेर निघाले. परंतु १५ ऑगस्टपासून ते आजपर्यंत दररोज पावसामुळे उत्पादन खर्चही निघणार नाही, अशी अवस्था झाली आहे.
शेतकऱ्यांची अशी अवस्था पाहून पारोळा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशा मागणीचे निवेदन शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना दिले.
सततच्या पावसामुळे कापूस पिकाची वाईट अवस्था झाली आहे. परिणामी कापूस लाल पडला. लाल्या व दह्या रोगाचा प्रादुर्भाव शेतावर दिसू लागल्याने शेतांमध्ये पाणी तुंबल्याने झाडे कोमेजून कैऱ्या सडत आहेत. कापसाच्या बोंडा मधून उग्र स्वरूपाची दुर्गंधी येत आहे. ज्या आशेवर शेतकऱ्याने भविष्याचे स्वप्न पाहिले तेच स्वप्न डोळ्यांसमोर चकाचूर होताना दिसत आहे. आता जगावे की मरावे, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे.
यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, कार्याध्यक्ष भिकनराव पाटील, नरेश चौधरी, छावाचे तालुका शेतकरी आघाडीचे अविनाश मराठे, प्रकाश पाटील, संजय पाटील, अजित पाटील, अधिकार पाटील, प्रकाश पाटील, चेतन पाटील, सचिन पाटील, निलेश चौधरी, रघुनाथ पाटील, राजेंद्र पाटील, स्वाभिमानीचे वाल्मीक पाटील उपस्थित होते.