केळीची नुकसानभरपाई मिळण्यास बिलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:15 IST2021-09-25T04:15:26+5:302021-09-25T04:15:26+5:30
केऱ्हाळे, ता. रावेर : गत एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत वेगवेगळ्या तारखेस तालुकाभरात वादळी वाऱ्यामुळे केळीचे खूप ...

केळीची नुकसानभरपाई मिळण्यास बिलंब
केऱ्हाळे, ता. रावेर : गत एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत वेगवेगळ्या तारखेस तालुकाभरात वादळी वाऱ्यामुळे केळीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या वेळेस झालेल्या नुकसानीची भरपाई ही पीकविमा संरक्षण घेतलेल्या कंपनीकडून पूर्णतः तत्काळ मिळावी, अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. वादळ-वाऱ्यामुळे नुकसान झाले त्या वेळेस विमा कंपनीच्या नियमानुसार वेळेच्या आत शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या माध्यमांद्वारे कंपनीला सूचित केले आहे. त्याप्रमाणे कंपनीने आपले प्रतिनिधी पाठवून संबंधित शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन पंचनामे करून कंपनीकडे अहवाल सादर केलेले आहेत. सदर कार्यालयीन कामकाज कधीच आटोपले असून आता कंपनीकडून भरपाई होणे आवश्यक आहे. कारण ज्याप्रमाणे विमा हप्ता भरतेवेळी एक दिवसाचा विलंब झाला तर शेतकऱ्याला योजनेपासून दूर ठेवले जाते, त्याप्रमाणे शासनाच्या नियमानुसार १५ सप्टेंबरपर्यंत संबंधित विमा संरक्षण देणाऱ्या कंपनीने भरपाईची रक्कम लाभधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणेदेखील बंधनकारक आहे. मात्र मुदत संपून एक आठवडा झाला असून अद्यापही भरपाईची रक्कम देण्यासाठी कंपनीकडून कोणत्याही हालचाली दिसून येत नसल्यामुळे शेतकरी वर्गातून अनंत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कमाल व किमान तापमानातून तालुका निरंक असह्य तापमान व कडाक्याच्या थंडीचा सामना करूनदेखील तालुक्यातील कोणतेही महसूल मंडळ भरपाईस पात्र ठरले नसल्याचे कंपनीकडून जाहीर होताच शेतकरी अचंबित झाले आहेत. यामुळे संबंधित कंपनीच्या कामकाजावर शंका निर्माण केली जात आहे. अशा दुहेरी कचाट्यात सापडलेला शेतकरी भरपाईच्या रकमेची विवंचना करीत आहे.
सन २०२०/२१ मध्ये वादळामुळे झालेली हानी अपरिमित आहे. मात्र आमच्या हक्काच्या विमा संरक्षणापोटी मिळणारी रक्कम तत्काळ मिळावी. अन्यथा शेतकरी कर्जाच्या खाईत जास्त ढकलला जाईल
- योगेश प्रकाश पाटील शेतकरी, केऱ्हाळे, ता. रावेर