२८ हजार ९८ स्नातकांना आभासी पद्धतीने पदव्या बहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:26 IST2021-05-05T04:26:11+5:302021-05-05T04:26:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ सोहळ्यात आभासी पद्धतीने २८ हजार ...

२८ हजार ९८ स्नातकांना आभासी पद्धतीने पदव्या बहाल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ सोहळ्यात आभासी पद्धतीने २८ हजार ९८ स्नातकांना पदवी बहाल करण्यात आली. सुवर्णपदक प्राप्त ९९ विद्यार्थ्यांपैकी तीन सुवर्णपदकधारक विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी नावे घोषित केली.
कोरोनाचा संसर्ग कमी झाला, असे वाटत असताना अचानक दुसरी लाट आली. पुन्हा कोरोनाने अक्षरश: थैमान घातले अन् पुन्हा शाळा, महाविद्यालय व विद्यापीठाची दारं विद्यार्थ्यांसाठी बंद झाली. दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून कठोर निर्बंध घालून देण्यात आले. परिणामी, कार्यक्रम, बैठका घेण्यासही बंदी घालण्यात आली. त्यामुळे सोमवारी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ऑनलाइन पद्धतीने साजरा झाला. यावेळी सुवर्णपदक प्राप्त ९९ विद्यार्थ्यांपैकी तीन सुवर्णपदकधारक विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी नावे घोषित केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशुतोष पाटील व प्रा.सुरेखा पालवे यांनी केले. या समारंभाला व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य व विद्यापरिषद सदस्य दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
बी.टेक.च्या ४३७ विद्यार्थ्यांना पदवी बहाल
दीक्षांत समारंभात २८ हजार ९८ स्नातकांना पदव्या बहाल करण्यात आल्या. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे १६ हजार ३५८ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे पाच हजार १८९ स्नातक, मानव्य विद्याशाखेचे पाच हजार ३५ आणि आंतर विद्याशाखेचे एक हजार ७९ स्नातकांचा समावेश आहे. त्यामध्ये २६१ पीएच.डी.धारक विद्यार्थी आहेत. या शिवाय स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे बी.टेक.चे ४३७ विद्यार्थ्यांनादेखील पदवी बहाल करण्यात आल्या.
आनंदाचे क्षणही हिरावले....
दरवर्षी, दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांसह पालकांचासुद्धा सन्मान होत असतो. पाल्यास सुवर्णपदक मिळाल्याचा क्षण पाहून अनेक पालकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू अनावर होतात. विशेष ड्रेस कोडमध्ये विद्यार्थी कार्यक्रमाला हजेरी लावतात. सुवर्णपदकासमवेत सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढण्याचा मोहदेखील विद्यार्थ्यांकडून आवरेनासा होतो. एवढेच नव्हे तर व्हॉट्सॲपचे स्टेट्ससुद्धा विद्यार्थी अपडेट करतात. पण, यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदावर पाणी फेरले गेले. यश मिळविले मात्र दीक्षांत समारंभात होणाऱ्या सन्मानापासून दूर रहावे लागले. दीक्षांत समारंभामुळे गजबजणारे दीक्षांत सभागृहात सोमवारी फक्त बोटावर मोजण्याइतकेच अधिकारी पहायला मिळाले.
सुधारित यादी जाहीर
अधिक गुण मिळवूनसुद्धा सुवर्णपदकापासून विद्यार्थिनी वंचित राहिली होती. हा प्रकार मासू संघटनेने विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिले. नंतर विद्यापीठाने दुरुस्ती करीत त्या विद्यार्थिनीला सुवर्णपदक जाहीर केले आहे. नवीन सुधारित सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाने प्रसिद्ध केली आहे.