श्री गणेशमूर्ती विक्रीसाठी तीन जागा केल्या निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:21 IST2021-09-08T04:21:50+5:302021-09-08T04:21:50+5:30
जळगाव : अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून, मनपातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील श्री गणेशमूर्ती विक्रेत्यांना टॉवर चौक, दुर्गा ...

श्री गणेशमूर्ती विक्रीसाठी तीन जागा केल्या निश्चित
जळगाव : अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून, मनपातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील श्री गणेशमूर्ती विक्रेत्यांना टॉवर चौक, दुर्गा देवी मंदिर व बहिणाबाई उद्यानाजवळ स्टॉल लावण्याची परवानगी देण्यात आली आहे, तर या स्टॉलधारकांकडून त्यांना लागणाऱ्या जागेच्या आकारानुसार भाडे आकारण्यात येणार असल्याचे मनपाच्या सूत्रांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध प्रकारच्या सजावटीच्या साहित्यांची दुकाने थाटायला सुरुवात झाली असून, बुधवारपासून श्री गणपती मूर्ती विक्रेत्यांची दुकानेही थाटायला सुरुवात होणार आहे. यासाठी मनपा प्रशासनातर्फे दरवर्षीप्रमाणे टॉवर चौकाकडून जिल्हा परिषदेकडे जाणारा रस्ता, घाणेकर चौकातून बळिराम पेठेकडे जाणारा रस्ता आणि कवयित्री बहिणाबाई उद्यानाच्या लगतच्या जागेत गणेशमूर्ती विक्रेत्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तीन दिवस विक्रेत्यांना या ठिकाणी स्टॉल लावण्याची परवानगी दिली जाणार आहे. या विक्रेत्यांकडून एक रुपया स्क्वेअर फूटप्रमाणे भाडे आकारण्यात येणार आहे. विक्रेत्यांना स्वखर्चाने लाईटची व्यवस्था करावी लागणार आहे.
इन्फो :
पूजा साहित्य विक्रेत्यांना २० रुपयांची पावती
मनपातर्फे श्री गणेशमूर्ती विक्रेत्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्यानंतर, विविध प्रकारचे पूजा साहित्य विक्रेत्यांसाठी टॉवर चौक ते चौबे मार्केटपर्यंतच्या रस्त्यावर व्यवस्था करण्यात आली आहे. या विक्रेत्यांनाही तीन दिवस व्यवसायाची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्याकडून दिवसाला २० रुपयांची पावती आकारण्यात येणार असल्याचे किरकोळ वसुलीचे विभागाचे कर्मचारी नरेंद्र चौधरी यांनी सांगितले.