शिवसेना,भाजप तालुकाध्यक्षांना पराभवाचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:19 IST2021-01-19T04:19:11+5:302021-01-19T04:19:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालामध्ये जळगाव तालुक्यात अनेक जुन्या धुरंधरांना पराभवाचा सामना करावा लागला असून यंदा ...

Defeat to Shiv Sena, BJP taluka president | शिवसेना,भाजप तालुकाध्यक्षांना पराभवाचा धक्का

शिवसेना,भाजप तालुकाध्यक्षांना पराभवाचा धक्का

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालामध्ये जळगाव तालुक्यात अनेक जुन्या धुरंधरांना पराभवाचा सामना करावा लागला असून यंदा नवख्यांना संधी मिळाली आहे. तालुक्यात अनेक धक्कादायक निकाल लागले असून यात शिवसेनेसह भाजप तालुकाध्यक्षांना कानळदा ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर विधानसभा निवडणूक लढविलेले उमेदवार रवी देशमुख असोदा येथील ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झाले असून कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय वराडे यांचा चिंचोली येथे पराभव झाला.

कानळदा ग्रामपंचायत निवडणुकीत वाॅर्ड क्र.१ व ६ मध्ये शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, त्यांच्या पत्नी माजी जि. प. महिला बालकल्याण सभापती नीता चव्हाण व पुत्र ऋषी चव्हाण या तिघांना पराभूत व्हावे लागले आहे. राजेंद्र चव्हाण यांचा पराभव सेवानिवृत्त डीवायएसपी पुंडलिक सपकाळे यांनी केला आहे.

कानळदा येथीलच भाजपचे तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. तिरंगी लढतीत त्यांना दारूण पराभव सहन करावा लागला.

जि.प. सदस्यांचे पती पराभूत

यापूर्वी विधानसभा निवडणूक लढविलेले रवी देशमुख यांना असोदा येथील ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव सहन करावा लागला आहे. विद्यमान जि.प. सदस्या पल्लवी देशमुख यांचे ते पती आहेत. असोदा येथील सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते किशोर चौधरी हेदेखील निवडणुकीत पराभूत झाले आहेत.

माजी तालुकाध्यक्ष पराभूत

कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजय वराडे हे चिंचोली येथून निवडणूक रिंगणात होते. त्यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे.

Web Title: Defeat to Shiv Sena, BJP taluka president