३८ वर्षांनंतर पिंपळे पाझर तलावाचे खोलीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:11 IST2021-06-19T04:11:39+5:302021-06-19T04:11:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : तब्बल ३८ वर्षांनंतर पिंपळे येथील पाझर तलावाचे खोलीकरण होत असल्याने सहा गावांच्या ...

Deepening of Pimple Passer Lake after 38 years | ३८ वर्षांनंतर पिंपळे पाझर तलावाचे खोलीकरण

३८ वर्षांनंतर पिंपळे पाझर तलावाचे खोलीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : तब्बल ३८ वर्षांनंतर पिंपळे येथील पाझर तलावाचे खोलीकरण होत असल्याने सहा गावांच्या हजारो एकर शेतीला त्याचा लाभ होणार आहे, तर पिंपळे गावाच्या पाणीपुरवठा योजनेचादेखील प्रश्न मिटणार आहे.

तालुक्यातील पिंपळे येथे खडके नाल्यावर १९८२ साली तत्कालीन शेतकी संघाचे चेअरमन स्व. हरी निंबाजी पाटील यांनी पाझर तलाव बांधला होता. ३८ वर्षांत या तलावाचे खोलीकरण झालेले नव्हते. पिंपळे येथील पाणीपुरवठा योजना याच पाझर तलावावर अवलंबून आहे. शेतकी संघाचे माजी अध्यक्ष संजय पुनाजी पाटील, सरपंच दिनेश पाटील व गावकऱ्यांनी पाझर तलाव खोलीकरणाचा प्रस्ताव आमदार अनिल पाटील यांच्याकडे मांडला. त्यांनी तत्काळ मृदसंधारण विभागाशी चर्चा करून ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन मंजुरी मिळवली. मात्र खोलीकरणाला लागणाऱ्या खर्चाची समस्या होतीच.

यांचे लाभले सहकार्य

आमदार अनिल पाटील यांनी जेसीबी व डंपर मालक अरुण पाटील, नीलेश भांडारकर, भूषण बडगुजर व त्यांच्या सहकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या लाभासाठी व ग्रामस्थांसाठी मोफत खोलीकरण करून देण्यास सांगितले. आमदारांच्या हस्ते खोलीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपसरपंच हिरालाल पाटील, बाजार समिती संचालक संभाजी पाटील, गौरव पाटील व ग्रामस्थ हजर होते. सुमारे १५ फुटापर्यंत खोलीकरण झालेले आहे.

सहा गावांना होणार लाभ

खोलीकरणामुळे वाघोदा, चिमनपुरी, पिंपळे बुद्रुक, पिंपळे खुर्द, खडके व निसर्डी गावाच्या शिवारातील काही भाग अशा हजारो एकर शेतीला सिंचनाचा लाभ होणार आहे. विहिरींची पाणीपातळी वाढून दुबार पिके घेता येतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास तसेच जनावरांच्या चाऱ्याची समस्या मिटेल.

पाझरलेले पाणी माळण नदीत

तलावाचे पाझरलेले पाणी माळण नदीत जात असल्याने त्याचाही लाभ होणार आहे. तलावातून निघालेल्या गाळ आणि मुरूम भराव तसेच शेत रस्ते यांच्यासाठी उपयोगी ठरत आहे. तर पिंपळे येथील पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेचीदेखील समस्या मिटणार आहे.

---

१९सीडीजे ५

Web Title: Deepening of Pimple Passer Lake after 38 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.