लोकसाहित्याच्या पर्वाचा अस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:28 IST2021-03-04T04:28:53+5:302021-03-04T04:28:53+5:30

जळगाव : कवितासंग्रह, बालकवितासंग्रह, लोकसाहित्याचे लिखाण, विविध साहित्याचे संपादन, वैचारिक लेखसंग्रह, विविध मंडळांवर पदाधिकारी, अभ्यासक, विविध ग्रंथांना प्रस्तावना ...

The decline of folklore | लोकसाहित्याच्या पर्वाचा अस्त

लोकसाहित्याच्या पर्वाचा अस्त

जळगाव : कवितासंग्रह, बालकवितासंग्रह, लोकसाहित्याचे लिखाण, विविध साहित्याचे संपादन, वैचारिक लेखसंग्रह, विविध मंडळांवर पदाधिकारी, अभ्यासक, विविध ग्रंथांना प्रस्तावना अशा विविध साहित्याचे धनी असलेले प्राचार्य किसन पाटील यांच्या निधनाने लोकसाहित्याच्या पर्वाचा अस्त झाल्याच्या प्रतिक्रिया साहित्य क्षेत्रातून उमटत आहे.

शिक्षण, साहित्य क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही भरीव योगदान असलेल्या प्राचार्य किसन महादू पाटील यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले आणि खान्देशातील साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या चाहत्यांना, साहित्यिकांना तसेच शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला.

शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान

डॉ. किसन पाटील हे मूळ राहणार वाघोड, ता. रावेर येथील रहिवासी होते. रावेर येथील सरदार जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कलाशिक्षक म्हणून त्यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रातील कार्याला सुरुवात केली. त्यानंतर मू. जे. महाविद्यालयात पदव्युत्तर मराठी विभागाचे प्रमुख म्हणून जळगावात आले व ते जळगावकरच झाले. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कला विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता, एसएनडीटी महिला महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी यशस्वी धुरा संभाळली.

विविध पदांचे धनी

जळगावात झालेल्या खान्देशस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रणित अखिल भारतीय मराठी जनसाहित्य संमेलन (मोझरी, अमरावती), ५७ वे अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलन (मुक्ताईनगर), राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन (पाचोरा) अशा विविध संमेलनांमध्ये त्यांनी अध्यक्षपदाची धुरा संभाळली होती.

स्मरणात राहणारे साहित्य योगदान

कवितासंग्रह, बालकवितासंग्रह, लोकसाहित्याचे त्यांनी लिखाण केले. या सोबतच विविध साहित्याचे संपादन, वैचारिक लेखसंग्रह यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. कुमारभारती, युवक भारती यातही योगदान देत मराठी भाषेच्या आठ पाठ्यपुस्तकांसाठी त्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणावर कार्य केले. विविध मंडळांवर पदाधिकारी, अभ्यासक म्हणूनही त्यांची वेगळी ओळख राहिली. विविध ग्रंथांना प्रस्तावना, अनेक भाषणे, व्याख्याने, अध्यक्षीय भाषणे, संशोधन मार्गदर्शक, आकाशवाणी-दूरदर्शन कार्यक्रमात सहभागदेखील स्मरणात राहणारा आहे.

तीन कवितासंग्रह, दोन बालकवितासंग्रह, दोन लोकसाहित्याचे संशोधन, तीन गौरवग्रंथ, लोककथा आणि कोळी गीतांचे संपादन, समीक्षा, लेखमाला असे विपुल साहित्य प्राचार्य किसन पाटील यांच्या हातून आकाराला आले.

शिक्षण, साहित्य क्षेत्रात भूषविले विविध पदे

मंडळांचे कार्यकारी सदस्य, विविध साहित्य संघ, शिक्षण क्षेत्रातील स्थानिक व्यवस्थापन सामिती, जनसंवाद व पत्रकारिता विभागात लघुशोध प्रकल्प विविध ग्रंथांना प्रस्तावना यातही त्यांचा लक्षणीय सहभाग राहिला.

आज अंत्यसंस्कार

प्राचार्य किसन पाटील यांच्या पार्थिवावर बुधवार, ३ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Web Title: The decline of folklore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.