वीजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
By Admin | Updated: May 13, 2014 00:19 IST2014-05-13T00:19:55+5:302014-05-13T00:19:55+5:30
मंडपाच्या पाईपात वीज प्रवाह उतरल्याने राजेश नाना रोकडे (वय-२२) हा युवक हात धुवत असताना वीजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

वीजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
जामनेर : विवाह सोहळ्याच्या हळदीच्या दिवशी मंडपाच्या पाईपात वीज प्रवाह उतरल्याने राजेश नाना रोकडे (वय-२२) हा युवक हात धुवत असताना वीजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शहरातील पाचोरा रस्त्यावर एका लग्नसमारंभात ११ रोजी रात्री १० वाजता घडली. यामुळे लग्न घरी शोककळा पसरली. मंडपात फोकस लावण्यासाठी आकोडा टाकून वीजपुरवठा घेण्यात आला होता. त्याबाजूलाच असलेल्या मंडपाच्या पाईपात वीजप्रवाह उतरुन राजेशचा जीव गेला. बालाजी ट्रेडर्सचे संचालक विलास गोसावी यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त ११ रोजी हळदीचा समारंभ व रात्री संगीत रजनीचा कार्यक्रम होता. मित्रपरिवार नाचण्यात व्यस्त होता. जेवणानंतर राजेश हा हात धुत असताना पाणी या खांबावर पडले व तो खांबाकडे ओढला जाऊन तेथे चिटकला. हा प्रकार इतरांच्या लक्षात आला पण तोवर वेळ निघून गेली होती. तिथे उपस्थित एकाने त्याला धक्का देऊन खाली फेकले पण तोपर्यंत राजेश काळा पडला होता. त्याला जवळच्या हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले. प्राथमिक उपचारा नंतर जळगावला नेण्यात आले. पण तोवर राजेशचा मृत्यू झाला होता. या प्रकारामुळे लग्नघरीही शोककळा पसरली. राजेश लहानपणापासून विलास गोसावी यांच्याकडे कामाला होता. तारेवर टाकला आकोडा गोसावी यांच्याकडे स्वत:चे जनरेटर आहे. पण वायरमनने फोकससाठी वीजेच्या तारेवर आकोडा टाकून वीज प्रवाह घेतला. फोकस सुरु असल्या पासूनच मंडपात वीज प्रवाह उतरत होता. ही बाब मंडप टाकणार्याच्या लक्षात आली. त्याने त्यांनाही सूचना केली होती. रात्री बँडचे वाहन मंडपात आले तेव्हाही एकदा विजेचा धक्का बसला होता. त्यावेळी बॅन्डवाल्याने सूचना केली होती, अशी माहिती मिळाली. त्याचे बोल खरे ठरल्याचे म्हटले जात आहे. राजेशचा मनमिळावू स्वभाव दत्तचैतन्य नगर भागातील नाना नामदेव रोकडे यांचा राजेश मुलगा. तो १० ते १२ वर्षापासून ते विलास गोसावी यांच्याकडे कामाला होता. अतिशय प्रामाणिक सर्वाशी मनमिळवून राहणारा राजेश गोसावी याचा विश्वास होता तेही त्याला आपल्या मुलाप्रमाणेच वागवत होते. राजेशच्या मृत्यूने त्यांच्यावरही मोठाच आघात झाला.