गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:00 IST2021-02-05T06:00:53+5:302021-02-05T06:00:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जामनेर येथून संदर्भीत केलेल्या २७ वर्षीय गर्भवती महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारादरम्यान ...

गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जामनेर येथून संदर्भीत केलेल्या २७ वर्षीय गर्भवती महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणा केल्याचा आरोप केल्याची माहिती आहे. शुक्रवारी पहाटे ८ वाजता ही घटना घडली.
मनीषा आकाश जोशी २७ ही महिला ९ महिन्यांची गर्भवती होती. जामनेर येथून गुरुवारी रात्री त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेवर शुक्रवारी सकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी काही प्रमुख डॉक्टर उपस्थित नव्हते, उपचारास विलंब तसेच निष्काळजीपणा झाल्याचे नातेवाइकांचे म्हणणे होते. मात्र, गर्भ पोटातच मृत झाले होते. गर्भपिशवी खराब होती, अत्यंत गंभीरावस्थेत महिला दाखल झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. दरम्यान, अतिरक्तस्त्राव हे प्राथमिक कारणही शवविच्छेदनात समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच व्हिसेरा तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
डॉक्टरांचे काय म्हणणे
स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितल्यानुसार महिलेला गंभीरावस्थेत जीएमसीत दाखल करण्यात आले होते. सर्व डॉक्टर यावेळी उपस्थित होते. डॉक्टरांनी पूर्ण शर्थीचे प्रयत्न केले मात्र, अन्ननलिकेतील अन्न हे श्वास नलिकेत गेल्याने महिलेला श्वास घेण्यास त्रास झाला व यात महिलेचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्यानुसार मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.