निवडणुक पथकातील हवालदाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 18:05 IST2019-05-17T18:05:13+5:302019-05-17T18:05:22+5:30
रावेर : मुंबई, औरंगाबादला सुरू होते उपचार

निवडणुक पथकातील हवालदाराचा मृत्यू
रावेर : लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहिता नियंत्रण कक्षांतर्गत चोरवड सीमा तपासणी नाक्यावर नियुक्त स्थिर सर्व्हेक्षण पथकातील हवालदार राजेंद्र पाटील यांचा ७ मे रोजी मृत्यू झाला.
सर्वेक्षण पथकात सेवा बजावत असतांना हेडकॉन्स्टेबल राजेंद्र बाबुराव पाटील (वय ५२) (रा.अंतुर्ली ता.मुक्ताईनगर) यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांना अत्यवस्थेत रावेर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, त्यांची चिंताजनक प्रकृती पाहता जिल्हा सामान्य रुग्णालयात व तेथूनही मुंबई येथे सर जे. जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
याठिकाणी त्यांच्या प्रकृतीत फरक न जाणवल्याने त्यांना औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात परत आणले होते. त्याठिकाणी औषधोपचार सुरू असताना त्यांचा ७ मे रोजी अकस्मात मृत्यू झाला. सदरील अकस्मात मृत्यूचे कागदपत्र शून्य क्रमांकाने औरंगाबाद पोलिसांकडून रावेर पोलिसात दाखल झाल्याने गुरुवार १६ मे रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.