ठळक मुद्देगेल्या सहा महिन्यात जळगाव तालुक्यात चार बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव: जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास गावापासून काही अंतरावर असलेल्या एका शेतातील विहिरीमध्ये एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. विहिरीत पडूनच बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
बिबट्याचा मृत्यू तीन दिवसांपूर्वी झाला असल्याचा दावा वन विभागाकडून करण्यात आला असून, बिबट्याचा मृतदेहावर पोस्टमार्टम करण्यात येणार आहे. विहिरीत पडल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या सहा महिन्यात जळगाव तालुक्यात चार बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात तीन बिबट्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला होता तर आता या बिबट्याचा मृत्यू विहिरीत पडल्यामुळे झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.