आरुषीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST2021-09-09T04:22:48+5:302021-09-09T04:22:48+5:30
एसडीआरएफ पथक पोहोचले सात्रीत अमळनेर : आरुषी भील या मुलीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी एसडीआरएफ पथक (राज्य ...

आरुषीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी
एसडीआरएफ पथक पोहोचले सात्रीत
अमळनेर : आरुषी भील या मुलीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी एसडीआरएफ पथक (राज्य आपत्ती प्रतिसाद दल) सात्री गावात पोहोचले. पहिल्याच दिवशी डॉक्टर व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सात्री गावात जाऊन अनुक्रमे २३१ नागरिकांची व १७३ गुरांची तपासणी केली व त्यांच्यावर औषधोपचार केले.
एसआरडीएफचे ३५ स्वयंसेवक बोट घेऊन पोहोचल्यानंतर प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ यांच्यासह डॉक्टर, परिचारिका, पशुवैद्यकीय अधिकारी नदी ओलांडून सात्री गावात पोहोचले. व्हायरल इन्फेक्शन झाल्याने अनेक लोक आजारी पडले होते. पूल नाही आणि पुराचे पाणी यामुळे गावाचा प्रवेश बंद असल्याने उपचार होत नव्हते आणि उपचाराअभावी आरुषीचा मृत्यू झाला. सात्री ग्रामस्थांनी तिचे शव प्रांत कार्यालयात आणल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेतली. महेंद्र बोरसे यांनी माणसांचे आरोग्य शिबिर घेण्यासह जनावरांच्या आरोग्याबाबतही तक्रार केली होती. त्यांच्या मागणीची तातडीने दखल घेत. डॉ. दिनेश पाटील, डॉ. असलम, आरोग्यसेवक दीपक पाटील, पगारे यांनी लहान मुले, महिला, वृद्ध अशा २३१ जणांची प्राथमिक शाळेत तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केले तर पशुधन विकास अधिकारी डॉ. मुकेश पाटील, व्ही. ए. धनगर, सतीश सोनवणे, सुहास चौधरी, शुभम साळुंखे यांनी १७३ गुरांची तपासणी करून लसीकरण व त्यांच्यावर उपचार केले.
संकटात आणि बिकट परिस्थिती असतानाही एसआरडीएफ पथक व डॉक्टरांच्या भोजनाची व्यवस्था गावातून प्रत्येक घरातून करण्यात आली. महेंद्र बोरसे, सरपंच सुनीता बोरसे, सचिन बोरसे, खंडेराव मोरे, आसाराम भिल, श्रीराम भिल, शाळीग्राम बोरसे, महेंद्र मोरे, ग्रामसेवक श्याम धनगर, शिक्षक विलास पाटील यांनी भरपावसात सहकार्य केले. एसआरडीएफ पथकाचे प्रमुख सोनवणे व राठोड यांनी पथकाला घेऊन येण्यासाठी २५ फेऱ्या केल्या.