दुर्दशा झालेल्या उर्दू शाळेत विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:12 IST2021-06-26T04:12:45+5:302021-06-26T04:12:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : गावातील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेची सध्या प्रचंड दुरवस्था झाली असून छताचे प्लास्टर निखळून खाली ...

दुर्दशा झालेल्या उर्दू शाळेत विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : गावातील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेची सध्या प्रचंड दुरवस्था झाली असून छताचे प्लास्टर निखळून खाली पडू लागले आहे. जीर्णावस्थेतील शाळा विद्यार्थ्यांसाठी धोकादायक बनलेले असताना नवीन वर्गखोल्या बांधण्याच्या बाबतीत कोणतीच हालचाल झालेली नाही. पाल्याच्या जीवितास निर्माण झालेला धोका लक्षात घेता बऱ्याच पालकांचा दुसऱ्या शाळांकडे ओढासुद्धा वाढला आहे.
दरम्यान, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी काही दिवसांनी शाळा सुरू झाल्यानंतर या वर्गखोल्या धोकादायक ठरू शकणार असल्याच्या शक्यतेने पालक धास्तावले आहेत.
उर्दू शाळेला स्वतःची इमारत नसल्याचे लक्षात घेऊन तत्कालीन ग्रामपंचायतीने मुस्लीम कब्रस्तानालगत आमदार निधीतून दोन वर्गखोल्यांचे बांधकाम केले होते. मात्र, कालौघात विद्यार्थी संख्या वाढल्यानंतर वर्गखोल्यांची संख्या वाढविण्याची गरज असताना आहे त्या खोल्यांमध्येच विद्यार्थ्यांना शिकविण्याची वेळ आता शिक्षकांवर आली. देखभाल व दुरुस्ती खर्चाची वेळोवेळी तरतूद करण्यात न आल्याने सद्यःस्थितीत दोन्ही खोल्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे. तसेच छताचे प्लास्टर निखळून खाली पडू लागले आहे. अशा या परिस्थितीत जीव धोक्यात घालूनच विद्यार्थी व शिक्षक वेळ निभावत असले तरी त्यामुळे केव्हाही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषदेने तलाव परिसरात नवीन दोन वर्गखोल्या मंजूर करून दिल्या आहेत. मात्र, त्यांचे बांधकाम सुरू होण्याची कोणतीच चिन्हे अद्याप दिसून आलेली नाहीत. काळाची गरज ओळखून नवीन तीन खोल्यांचे बांधकाम तातडीने सुरू करण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे.
-----------------------------------------------------------
(कोट)....
जिल्हा परिषदेच्या ममुराबाद येथील उर्दू शाळेत ७४ विद्यार्थी आणि तीन शिक्षक आहेत. सध्या दोनच वर्गखोल्यांमध्ये शाळा चालविली जाते. नवीन वर्गखोल्या मंजूर झालेल्या असल्या तरी त्यांचे बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही.
- शेख जमील शेख हयात, मुख्याध्यापक
--------
(कोट)...
ममुराबाद येथील उर्दू शाळेची गेल्या काही वर्षांपासून दुर्दशा झाली आहे. केव्हा काय होईल सांगता येत नसल्याने पाल्यास तशा शाळेत पाठवून कोण धोका पत्करेल. त्यामुळे मी पाल्याचा दाखला काढून दुसऱ्या शाळेत त्याचे नाव टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
- शेख नाशीर, पालक
-----------------------------------------
फोटो-
ममुराबाद येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेची सध्या प्रचंड दुर्दशा झाली आहे. छताचे प्लास्टर निखळत असल्याने विद्यार्थी व शिक्षकांच्या जीवितास त्या ठिकाणी धोका निर्माण झाला आहे. (जितेंद्र पाटील)