‘कोरोना’ च्या पॉझिटीव्ह रुग्णावर नाचणखेड्याच्या डॉक्टरने केले उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 20:39 IST2020-03-29T20:39:30+5:302020-03-29T20:39:44+5:30
प्रशासनाने गाव केले सील : रुग्णाची बहिण व डॉक्टरला सिव्हीलला हलवले

‘कोरोना’ च्या पॉझिटीव्ह रुग्णावर नाचणखेड्याच्या डॉक्टरने केले उपचार
जामनेर : जळगाव शहरातील मेहरुण परिसरात शनिवारी कोरोनाचा पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णावर नाचणखेडा येथील डॉक्टराने उपचार केला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने रुग्णाच्या संपर्कातील त्याची जामनेर येथील बहिण व उपचार करणाऱ्या डॉक्टरला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तर प्रशासनाने खबरदारी म्हणून नाचणखेडा गाव सील केले आहे.
या रुग्णावर उपचार केल्यानंतर नाचणखेडे येथे आल्यानंतर डॉक्टरांनी गावातील रुग्णांची तपासणी केली. व कुटुंबासोबत वेळ घालवल्याची माहिती समोर येत आहे. या डॉक्टरांची गावात तीन घरे आहेत. कुटुंबात २५ सदस्य असावेत. त्यांच्या घराच्या परिसरात इतरांना जाण्यापासून रोखले आहे. या डॉक्टरला तातडीने तपासणीसाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्याशी संपर्कात आलेल्या नागरिकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. या डॉक्टरचे वडील व पत्नीसुध्दा डॉक्टर आहे.
जिल्हा आरोग्याधिकारी डी.एच.पातोडे, जिल्हा लसीकरण अधिकारी, डॉ.समाधान वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, डॉ.संदीप पाटील, डॉ.विजया जाधव, डॉ.जितेंद्र पाटील, वाय.पी.कोकाटे, आर.बी.जाधव यांनी रविवारी नाचणखेडे गावास भेट दिली व डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली.
बहिण काही दिवसांपासून
भावाकडेच
कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची बहिण गेल्या काही दिवसांपासून भावाकडेच होती. तिचे सासर जामनेरचे आहे. रविवारी रात्री ती मुलांसह येथे आली. ही माहिती पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक प्ररताप इंगळे व डॉ.हर्शल चांदा यांनी भेट दिली. महिला, तिचा पती व चार मुलांची तपासणी करून त्यांना लगेचच सिव्हीलमध्ये हलविण्यात आले.
कुटुंबियात लक्षणे नाही
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे व बीडीओ डी.एस.लोखंडे यांनी नाचणखेडे येथे भेट दिली. त्या डॉक्टरने गावात आल्यानंतर काही रुग्णांची आपल्या दवाखान्यात तपासणी केल्याने त्यांना व कुटुंबीयांना १४ दिवस सक्तीने विलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळली नसल्याचे डॉ.सोनवणे यांनी सांगितले. वाकोद आरोग्य केंद्राचे पथक गावात थांबून आहे.