वादळी पावसामुळे २२ घरांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:17 IST2021-05-18T04:17:34+5:302021-05-18T04:17:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादामुळे रविवारी जळगाव जिल्हयातील काही तालुक्यांमध्ये वादळी पावसाने ...

वादळी पावसामुळे २२ घरांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादामुळे रविवारी जळगाव जिल्हयातील काही तालुक्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली. या वादळामुळे अमळनेर तालुक्यातील अंचलवाडीतील दोघी बहिणीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यातील २२ घरांचे नुकसान झाले आहे. याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे.
रविवारी दुपारपासून जळगाव शहरासह जिल्हयात वादळी वा-यासह पावसाचे आगमन झाले. त्यामुळे बहुतांश भागांमधील वीज वाहिन्या तुटल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. दुसरीकडे जळगाव तालुक्यातील मोहाडी गावातील ३ हेक्टर जमिनीवरील पिकांचे वादळी वा-यामुळे नुकसान झाले आहे. याबाबत तालुकासह जिल्हा प्रशासनाकडे नोंद घेण्यात आली आहे. तर शहरातील चिमुकले राम मंदिर, रिंगरोड, हरिविठठल नगर झाडे कोसळली होती. सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही.
दोन बैलांचा मृत्यू
वादळी पाऊस सुरू असताना वीज कोसळून अमळनेर तालुक्यातील मंगळरूळ येथील शशिकांत पाटील यांचा मालकीचा बैल तर झाड कोसळून अमळनेर तालुक्यातील वावडे येथील भालेराव पाटील यांच्या मालकीच्या बैलाचा मृत्यू झाला आहे.
सख्या बहिणींच्या अंगावर कोसळले झाड
अमळनेर तालुक्यातील अंचलवाडी गावाबाहेर खळ्यात चिंचेच्या झाडाजवळ झोपडीवर झाड कोसळले. त्यात ज्योती बारेला आणि रोशनी बारेला या दोन्ही बहिणी झाडाखाली दबल्या जाऊन त्यांचा मृत्यू झाला. तर अमळनेर तालुक्यातीलचं पळासदळे येथे घर बांधकामासातील पत्रे व विटा अंगावर पडून दिलीप पाटील यांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला आहे.
कुठं पत्रे उडाले तर कुठं भिंती कोसळल्या...
पावसाने काही वेळ जोरदार हजेरी लावल्यामुळे जळगाव जिल्हयातील २२ घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये काहींचे पत्रे उडाले असून तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. फुलगाव (ता.भुसावळ) येथील विलास गायकवाड व रणाईचे येथील प्रकाशन रतन बोरसे तसेच सारबोटे (ता.अमळनेर) येथील सेना राठोड यांच्या घरांचे पत्रे उडून नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जानवे (ता.अमळनेर) येथील बाळू गोबा पाटील यांच्या पोल्ट्री फार्मचे पत्राचे छत व भिंत कोसळून नुकसान झाले आहे. कोळपिंप्री येथे एकाचे घराचे तर महाळपूर (ता.पारोळा) येथील १७ घरांचे पत्रे व भिंती कोसळून नुकसान झाले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे नोंद घेण्यात आली आहे.