जळगाव : लाभार्थ्यांची माहिती मोबाईलद्वारे भरताना इंग्रजीत हे ॲप असल्याने अंगणवाडी सेविकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, हे ट्रॅकर मराठीत असावे, अशी मागणी करीत राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. यावेळी घोषणाही देण्यात आल्या.
अंगणवाडीतील ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालके, गरोदर महिला, स्तनदा माता यांची माहिती अंगणवाडी सेविकांना मोबाईल ॲपवर भरावी लागते. हे ॲप इंग्रजीमधून आहे. आठवी ते बीएपर्यंत शिक्षण झालेल्या अंगणवाडी सेविकांची माहिती भरताना दमछाक होत आहे. मात्र, सरकार इंग्रजीतच माहिती भरण्याची सक्ती करत आहे. राज्य शासनाने हे ट्रॅकर मराठीतून उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी धरणागाव, चोपडा, पाचोरा, एरंडोल व जामनेर येथील अंगणवाडी सेविकांनी हे आंदेालन पुकारले होते. आंदोलनानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. तडवी यांना निवेदन देण्यात आले. योवळी आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉ. अमृत महाजन, प्रेमलता पाटील, लता सपकाळे, रेखा अहिरे, सुनंदा पाटील, मीनाक्षी काटोले, निशा येवले, कविता सोनवणे, संगीता पाटील, संध्या सोनार, रंजना मराठे, चंद्रकला बारी, दीपिका बारी, नंदा वाणी, शाम वाणी आदी उपस्थित होते.
...तर बहिष्कार
ॲप मराठीतून उपलब्ध करून न दिल्यास कामाची नोंद रजिस्टरवर लिहून इंग्रजी ट्रॅकर भरण्यावर बहिष्कार सुरूच राहणार असल्याचा इशारा अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनने दिला आहे.