प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यास मुंबईचे दररोज ‘उड्डाण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST2021-07-14T04:20:36+5:302021-07-14T04:20:36+5:30
जळगाव : विमानाच्या तांत्रिक कारणामुळे गेल्या महिनाभरापासून बंद असलेली विमानेसवा, १४ जुलैपासून पुन्हा सुरू होत आहे. मात्र, सध्या आठवड्यातून ...

प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यास मुंबईचे दररोज ‘उड्डाण’
जळगाव : विमानाच्या तांत्रिक कारणामुळे गेल्या महिनाभरापासून बंद असलेली विमानेसवा, १४ जुलैपासून पुन्हा सुरू होत आहे. मात्र, सध्या आठवड्यातून तीनच दिवस ही सेवा सुरू राहणार असून, जर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर १ ऑगस्टपासून मुंबईची विमानसेवा दररोज सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती विमान कंपनीचे व्यवस्थापक अखिलेश सिंग यांनी ‘लोकमत’ला दिली.
गेल्या दोन वर्षांपासून हैदराबाद येथील ‘ट्रू जेट’ या विमान कंपनीतर्फे गेल्या दोन वर्षांपासून जळगाव ते मुंबई दरम्यान विमानसेवा देण्यात येत आहे. उड्डाण योजने अंतर्गंत ही सेवा असल्यामुळे कोरोनाच्या कठीण काळातही ही सेवा नियमित सुरू होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अनेक विमान कंपन्यांच्या मुंबई विमानतळावरील उड्डाणांवर निर्बंध लादल्यामुळे, विमान कंपनीतर्फे आठवड्यातून बुधवार, शनिवार व रविवारीच ही सेवा सुरू होती. तर आता राज्य शासनाने हे निर्बंध उठविले असले तरी, १४ जुलैपासून सुरू होणारी विमानसेवा ही आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. दरम्यान, बुधवारपासून सुरू होणाऱ्या मुंबईच्या सेवेची तिकीट विक्री सोमवारी सायंकाळपासून ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली असून, या प्रवाशांना थेट विमानतळावरून तिकीट खिडकीवरूनही तिकीट खरेदी करता येणार असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
शासनाने मुंबई विमानतळावरील निर्बंध उठविले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अनेक विमान कंपन्यांच्या मुंबई विमानतळावरील उड्डाणांवर निर्बंध लादले होते. हे निर्बंध शासनाने नुकतेच उठविले आहे. त्यामुळे विमान कंपन्यांना पूर्ण क्षमतेने विमानसेवा चालविता येणार असून, त्यानुसार जळगावला विमानसेवा देणाऱ्या कंपनीतर्फेही प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यास नियमित ही सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.