बापरे...आता पुतण्याने केला काकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:19 IST2021-09-14T04:19:56+5:302021-09-14T04:19:56+5:30
जुन्या जळगावात राजू पंडित सोनवणे हे वरच्या मजल्यावर एकटे वास्तव्य करत होते, तर खाली आई द्रौपतीबाई या वास्तव्याला आहेत. ...

बापरे...आता पुतण्याने केला काकाचा खून
जुन्या जळगावात राजू पंडित सोनवणे हे वरच्या मजल्यावर एकटे वास्तव्य करत होते, तर खाली आई द्रौपतीबाई या वास्तव्याला आहेत. सोमवारी सकाळी १०.१५ वाजता नळांना पाणी आले होते. पाणी भरण्यासाठी राजू खाली नळावर का आले नाही म्हणून शेजारी राहणाऱ्या आशा सोनवणे या त्यांना आवाज देण्यासाठी वरच्या मजल्यावर गेल्या असता राजू रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी हा प्रकार त्यांची आई व इतर नातेवाईकांना सांगितला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शनी पेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळिराम हिरे, उपनिरीक्षक सुरेश सपकाळे, सहायक फौजदार रवींद्र पाटील, अमोल पाटील, गिरीश पाटील आदींचा ताफा दाखल झाला. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून काही नमुने संकलित केले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.
राजू यांचा घटस्फोट; मात्र पत्नीकडून सेवा
राजू यांचा प्रेमविवाह झालेला होता. जिल्हा रुग्णालयात सुरक्षा रक्षकाचे काम करायचे. दोन महिन्यांपासून त्यांनी हे काम सोडले होते. त्यांना एक मुलगा व तीन विवाहित मुले आहेत. पत्नी रजियाबी यांनी पतीपासून घटस्फोट घेतला आहे, त्यामुळे त्या पंचमुखी हनुमान मंदिराच्या मागे असलेल्या नवीन लक्ष्मी नगरात मुलासह वास्तव्याला आहेत. घटस्फोट झालेला असला तरी त्यांचे पतीकडे येणे-जाणे सुरू होते, इतकेच काय सुख:दुख व आजारपणात त्याच त्यांची सेवा करत होत्या. त्या सतत पतीच्या संपर्कात होत्या. पतीचा मृतदेह पाहिल्यानंतर त्यांनी एकच हंबरडा फोडला. मुलगा अश्वघोष व मुलींचाही प्रचंड आक्रोश सुरू होता. राजू यांच्या पश्चात पत्नी रजिया, मुलगा अश्वघोष, तीन विवाहित मुली, आई द्रौपती, भाऊ अनिल, सुहास, कैलास व सुनील असा परिवार आहे.
पुतण्यावर संशय; शोधार्थ पथक रवाना
राजू यांचा मोठा भाऊ अनिल यांचा मुलगा विशाल याच्यावर कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला असून पोलिसांना त्याचेच नाव सांगितले आहे. विशाल हादेखील व्यसनाधीन आहे, त्याचे सतत राजू याच्याशी वादविवाद होत होते. तोच त्यांच्या घरी सतत येत होता, त्यामुळे कुटुंबीयांनी त्याच्यावरच संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, विशाल याच्यावर संशय व्यक्त केल्यानंतर पथक त्याच्या शोधासाठी रवाना झाले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बळिराम हिरे यांनी दिली. त्याच्याविषयी ठोस पुरावा किंवा माहिती मिळालेली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.
दोन घटनांनी शहर हादरले
सतत आईच्या चारित्र्यावर संशय घेत असलेल्या प्रेमसिंग अभयसिंग राठोड (वय ५०, मूळ रा.घनश्यामपूर, ता.खकनार, जि.बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) यांचा मुलाने छातीत चॉपर खुपसून खून केल्याची घटना रविवारी सकाळी साडेदहा वाजता निमखेडी शिवारातील कांताई नेत्रालयाजवळ घडली होती. त्यात गोपाल व दीपक या दोन्ही मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर सोमवारी पुन्हा आंबेडकरनगरात खुनाचा घटना घडली. त्यात देखील पुतण्यावरच संशय व्यक्त केला जात आहे. सलगच्या दोन घटनांनी शहर हादरले आहे. याप्रकरणी शनी पेठ पोलीस ठाण्यात मुलगा अश्वघोष राजू सोनवणे याच्या फिर्यादीवरून विशाल अनिल सोनवणे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.