चक्रीवादळामुळे खान्देशातील ६७७ गावांची बत्ती झाली गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:17 IST2021-05-18T04:17:39+5:302021-05-18T04:17:39+5:30

महावितरण : जळगाव महावितरणच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी गावे अंधारात लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ' तौक्ते ' चक्री वादळाचा ...

The cyclone affected 677 villages in Khandesh | चक्रीवादळामुळे खान्देशातील ६७७ गावांची बत्ती झाली गुल

चक्रीवादळामुळे खान्देशातील ६७७ गावांची बत्ती झाली गुल

महावितरण : जळगाव महावितरणच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी गावे अंधारात

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ' तौक्ते ' चक्री वादळाचा फटका जळगाव जिल्ह्यासह धुळे व नंदुरबारलाही चांगलाच बसला आहे. या वादळामुळे अनेक ठिकाणचे सब स्टेशन व वीज खांब कोसळल्यामुळे खान्देशातील सुमारे ६७७ गावांचा वीज खंडित झाला. यात सोमवारी सायंकाळ पर्यंत महावितरण प्रशासनाने युद्ध पातळीवर काम करून ५९९ गावांचा वीज पुरवठा सुरळीत केला असल्याची माहिती महावितरणच्या जळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र मार्के यांनी' लोकमत'' ला दिली.

रविवारी दुपार पासूनच सर्वत्र सुरू झालेले वादळी वारे आणि त्यात काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. रविवारी रात्रभर आणि सोमवारी दुपार पर्यंत सुरू असलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी मुख्य अति उच्च दाब वाहिनीवरच्या तारा व खांब कोसळले. यात महावितरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यात ६७७ गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. यात जळगाव जिल्ह्यातील सुमारे साडे तीनशे गावांचा समावेश होता. त्या पाठोपाठ धुळे जिल्ह्यातील पावणे दोनशे तर उर्वरित नंदुरबार जिल्ह्यातील गावे होती.

इन्फो :

३ लाख ६० हजार ५२४ ग्राहक अंधारात

खान्देशात विविध गावात झालेल्या वीज पुरवठा खंडितमुळे ३ लाख ६० हजार ५२४ ग्राहक अंधारात होते. यापैकी सोमवारी सायंकाळ पर्यंत ३ लाख ३२ हजार ६३६ ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत झाला होता. तसेच या वादळात १४ हजार ८९५ रोहित्र बंद झाले असल्याचेही सांगण्यात आले. तसेच उच्च दाब वाहिनीचे ५२ व लघुदाब वाहिनीचे १५९ खांब कोसळले होते.

इन्फो :

७८ सब स्टेशन बंद

या वादळामुळे विविध ठिकाणचे एकूण ७८ सब स्टेशन बंद पडले होते. त्या पैकी काही सब स्टेशनचा रविवारी रात्री वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला होता. तर सोमवारी सायंकाळ पर्यंत ७२ सब स्टेशनचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. तसेच अतिउच्च क्षमतेच्या ४४२ वीज वाहिन्या बंद पडल्या होत्या, त्यातील ४०६ वीज वाहिन्या सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, सोमवारी सकाळ पासून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी जाऊन युद्ध पातळीवर काम करून सोमवारी सायंकाळ पर्यंत ५९९ गावांचा वीज पुरवठा सुरळीत केला होता.

इन्फो :

चक्री वादळात जळगाव परिमंडळात ज्या गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला, त्यातील बहुतांश गावांमध्ये रविवारी रात्रीच तर मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या भागात सोमवारी सकाळ पासूनच वीज पुरवठा सुरू करण्याचे काम सुरू होते. चक्री वादळाचे वारे असल्याने पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र, आमच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी सायंकाळ पर्यंत ९५ टक्क्यांपर्यंत वीज पुरवठा सुरळीत केला होता.

दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता, महावितरण

Web Title: The cyclone affected 677 villages in Khandesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.