ग्राहकांना वीज बिलांचा 'शॉक'
By Admin | Updated: August 26, 2014 14:48 IST2014-08-26T14:47:29+5:302014-08-26T14:48:29+5:30
ग्राहकांना चांगली सेवा देणे तर दूरच; मात्र काराभारातही सुधारणा होत नसल्यामुळे वीज ग्राहकांचा संताप होत आहे. ज्या ठेकेदारांना घरोघरी वीज बिल वितरणासाठी कंपनीने कंत्राट दिले आहे.

ग्राहकांना वीज बिलांचा 'शॉक'
मनीष चंद्रात्रे■ जळगाव
ग्राहकांना चांगली सेवा देणे तर दूरच; मात्र काराभारातही सुधारणा होत नसल्यामुळे वीज ग्राहकांचा संताप होत आहे. ज्या ठेकेदारांना घरोघरी वीज बिल वितरणासाठी कंपनीने कंत्राट दिले आहे. 'त्या' ठेकेदारांच्या कर्मचार्यांवर क्रॉम्प्टन कंपनी व स्वत: ठेकेदार यांचा 'वॉच' नसल्यामुळे नागरिकांना नियमित वीज बिल मिळत नसल्याच्या तक्रारींचा पाऊस पडत आहे.
शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये क्रॉम्प्टन कंपनी वीज ग्राहकांना हवी असलेली सेवा देण्यात अद्यापपर्यंत अपयशी ठरली आहे. विजेशी संबंधित तक्रारी असो किंवा वीज मीटर मिळण्याबाबत अनेकदा वीज ग्राहक स्वत: कंपनीत येऊन निवेदनांचा पाऊस पाडत असले तरी त्यांची दखल घेण्यासाठी कोणाला वेळ नसल्यामुळे पुन्हा महावितरण कंपनीने सूत्रे स्वीकारावी, अशी अपेक्षा आता सामान्य नागरिक व्यक्त करू लागले आहेत.
----------------
बिले तीन महिन्यानंतर..
कंपनीने शहरातील मनीष मुळे, शरद पांढरे, कपिल चौधरी व देवीदास पाटील या चार ठेकेदारांना वीज बिले वितरणाचा ठेका दिला असून काही ठेकेदारांचे कर्मचारी हरि विठ्ठल नगर, रामेश्वर कॉलनी या भागात वीज बिले वाटपासाठी टाळाटाळ करतात. त्यामुळे नागरिकांना तीन ते चार महिनयानंतर बिल मिळते. वीज बिल न मिळाल्यामुळे नागरिकांचा रोष पाहाता कंपनीने आता ठेकेदार बदल्याचा हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत येत्या दोन ते तीन दिवसात बैठक घेण्यात येईल. वीज ग्राहकांच्या घरी नियमित वीज पोहचविणार्या ठेकेदारालाच ठेका देण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
----------------
वीज ग्राहकांना नाहक भुर्दंड बिले का येत नाही? हे जाणून घेण्यासाठी क्रॉम्प्टन कंपनीत वीज ग्राहकांनी फोन केल्यानंतर अपेक्षित उत्तरे मिळत नाही. एकदम दोन ते तीन महिन्याचे एकत्रित बिल घेण्यासाठी नागरिकांना क्रॉम्प्टन कंपनीत यावे लागते. तेथे आल्यानंतरही तासन्तास रांगेत थांबावे लागते. तालुक्यातील गाढोदा, आसोदा, फुपनगरी, कानळदा, शिरसोली येथील वीज ग्राहकांनाही वीज बिल वेळेवर मिळत नसल्यामुळे येथील नागरिकांना नाहक पैसे खर्च करून कंपनीत यावे लागत असल्यामुळे ग्रामस्थांनाही नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. नियमित वीज बिल मिळत नाही. याबाबत क्रॉम्प्टन कंपनीकडे पाठपुरावा अनेकदा करूनही प्रश्न निकाली निघालेला नाही. त्यामुळे नाईलाजाने नेटवरून वीज बिल काढावे लागते.
-डॉ. अशोक माळी, वीज ग्राहक
-----------------
वीज बिल मिळत नसल्याची क्रॉम्प्टन कंपनीत दोनदा येऊन तक्रार केली आहे. या महिन्यात पाठवतो. पुढील महिन्यात नक्की बिल येऊन जाईल, असे उत्तरे ऐकावे लागतात.
-छाया इंगळे, वीज ग्राहक
-----------------
वीज बिले मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. गेल्या दोन महिन्यात ज्या वीज ग्राहकांचे वीज बिले 'पेंडिंग' आहेत. त्या ग्राहकांना बिले देण्यात आली आहे. पुढील महिन्यापासून नियमित वीज बिले ग्राहकांना मिळतील, याची काळजी घेतली जाईल. -भवानीप्रसाद राव, प्रभारी युनिट हेड, क्रॉम्प्टन कंपनी