वरणगावात जलद बसेस थांबत नसल्याने हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:21 IST2021-09-16T04:21:57+5:302021-09-16T04:21:57+5:30
वरणगाव : वरणगावात सर्व जलद बसेसना थांबा देऊन कंट्रोलरची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जलद बसेस ...

वरणगावात जलद बसेस थांबत नसल्याने हाल
वरणगाव : वरणगावात सर्व जलद बसेसना थांबा देऊन कंट्रोलरची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जलद बसेस थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
शहराच्या बाहेरून बायपास झाल्यामुळे इतर जिल्ह्यातील जलद बसेस वरणगाव शहरातून न जाता बायपासवरून निघून जातात. त्यामुळे वरणगावातील प्रवाशांना ताटकळत बसावे लागते. याबाबत नियंत्रक भगवान जगनोर व सहाय्यक बंजारा यांना जळगाव येथे भेटून निवेदन देण्यात आले.
वरणगाव शहरातून जाणाऱ्या सर्व अति जलद बसेसला थांबा देण्यात यावा. तसेच बसस्थानक चौकात येथून जाणाऱ्या व येणाऱ्या बसेसचे वेळापत्रक लावण्यात यावे. तसेच कायमस्वरूपी कंट्रोलर नेमण्यात यावा. त्यामुळे बसच्या पासेससाठी विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना भुसावळला जाण्याची गरज पडणार नाही. तसेच प्रवाशांना बसण्यासाठी बेंच बसविण्यात यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. त्यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन जिल्हा नियंत्रक जगनोर यांनी दिले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, मिलिंद भैसे, हितेश चौधरी, साबीर कुरेशी, कमलाकर मराठे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.