चलन डिटेक्टर मशीनचे; आतमध्ये दारुसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST2021-07-14T04:20:39+5:302021-07-14T04:20:39+5:30
सुनील पाटील जळगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने रविवारी रात्री चाळीसगाव औरंगाबाद रस्त्यावर बोढरे फाट्याजवळ ट्रकमधून ...

चलन डिटेक्टर मशीनचे; आतमध्ये दारुसाठा
सुनील पाटील
जळगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने रविवारी रात्री चाळीसगाव औरंगाबाद रस्त्यावर बोढरे फाट्याजवळ ट्रकमधून नेण्यात येत असलेली ८४ लाख रुपये किमतीची बनावट दारु पकडली. ट्रक चालकाकडे मालाचे चलन डिटेक्टर मशीनचे होते. पण प्रत्यक्षात आतमध्ये दारु होते. अजय कन्हैयालाल यादव (वय ४१,रा.इंदूर, मध्य प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे.
गोवा राज्यात तयार करण्यात आलेली बनावट दारु औरंगाबाद, चाळीसगावमार्गे मध्य प्रदेशात जात असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नाशिक विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी नाशिक येथून भरारी पथकाचे विभागीय निरीक्षक सी.एच.पाटील, दुय्यम निरीक्षक एस.एस.रावते, ए.डी.पाटील, कॉन्स्टेबल गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, भाऊसाहेब घुले, युवराज रवतेकर यांना सोबत घेऊन थेट चाळीसगाव गाठले. रविवारी रात्री औरंगाबाद रस्त्यावर सांगवी शिवारात बोढरे फाट्यावर साध्या गणवेशात सापळा लावला. औरंगाबादकडून येत असलेला ट्रक (क्र.एम.पी.०९,एच.जी.९३५४) अडवला व चालकाकडे मालाचे कागदपत्रे, त्यात काय माल आहे व कुठे चालला अशी विचारणा केली असता या ट्रकमध्ये प्लायवूडमध्ये पॅकींग केलेले डिटेक्टर मशीन असल्याची माहिती चालकाने दिली. पथकाने पॅकींग उघडून बघितली असता त्यात ताडपत्रीखाली झाकलेला गोवा निर्मित विदेशी मद्याचा साठा आढळून आला. १८० मिलिचे १२६० बॉक्स व त्यात ६० हजार ४८० रुपये किमतीची दारु आढळून आली. या दारुची किंमत ८४ लाख इतकी आहे. ट्रक, मोबाईल व इतर साहित्य मिळून १ कोटी ३ लाख १ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, अटकेतील यादव याला १५ जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
कर चुकवेगिरी अन् तोतयेगिरीही
माहिती लीक होऊ नये म्हणून उपायुक्त ओहोळ यांनी जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी जळगावात येत असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांना सांगून कारवाईची माहिती गोपनीय ठेवली. ही कारवाई पूर्ण होईपर्यंत जिल्ह्यातील एकाही अधिकाऱ्याला याची खबर लागू दिली नाही. महाराष्ट्र वगळता इतर कोणत्याच राज्याची दारु विक्री किंवा वाहतुकीस परवानगी नाही. शासनाचा कर चुकवून परराज्यातून मद्याची वाहतूक केली जाते. गोवा निर्मित ही दारु बनावट असल्याची माहिती भरारी पथकाचे निरीक्षक सी.एच.पाटील यांनी दिली.
उपायुक्तांना कळते..स्थानिकांना का नाही?
दरम्यान, या चालू आर्थिक वर्षात स्थानिक यंत्रणेकडून बनावट दारुची एकही कारवाई झाली नाही, आता जी कारवाई झाली ती देखील थेट उपायुक्तांनी केली. जळगाव जिल्ह्यातून बनावट व परराज्यातून दारुची वाहतूक होत असल्याची माहिती नाशिकमध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांना कळते, मग स्थानिक अधिकाऱ्यांना का नाही कळत? असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे. जानेवारी महिन्यात मन्यारखेडा शिवारात बनावट दारुचा कारखाना उदध्वस्त करण्यात आला होता.