जामनेरला लोकनियुक्त नगराध्यक्षाबाबत उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 17:02 IST2017-11-17T16:54:43+5:302017-11-17T17:02:01+5:30
आगामी नगरपालिका निवडणुकीत ओबीसी संवर्गात उमेदवारीसाठी स्पर्धा

जामनेरला लोकनियुक्त नगराध्यक्षाबाबत उत्सुकता
लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर, दि.१७ : आगामी काळात होणाºया जामनेर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने त्याविषयी जनमानसात उत्सुकता आहे. ओबीसी संवर्गातील राजकीय कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून कुटूंबातील महिलेला उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.
नगर पालिकेच्या पहिल्या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणुन राजु बोहरा विजयी झाले होते. भाजपचे (स्व.) ईश्वर वाघ यांनी त्यावेळी कडवी झुंज दिली होती. दुसºया निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्याने नगराध्यक्षपद साधना महाजन यांना दिले गेले. तिसºया निवडणुकीत काँग्रेस आघाडीने मुसंडी घेतल्याने पारस ललवाणी नगराध्यक्ष झाले. त्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपताच आघाडीत बिघाडी होवुन सत्तेची सुत्रे भाजपकडे येऊन पुन्हा साधना महाजन याचेकडे नगराध्यक्षपद आले होेते.
चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडला जाणारा लोकनियुक्त नगराध्यक्ष ओबीसी महिला आरक्षित आहे. अडीच वर्षापूर्वीच ललवाणी यांच्या नंतर नगराध्यक्ष पदासाठी तत्कालीन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.शरद पाटील यांच्या पत्नी सविता पाटील यांची दावेदारी मानली जात होती. त्यांना तसा शब्दही दिल्याचे ते सांगत, मात्र राजकारणात केव्हाही काहीही होवु शकते या उक्तीनुसार आघाडीच्याच नगरसेवकांनी ललवाणी यांची साथ सोडून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे बोट धरुन सत्तेत भागीदारी स्विकारली.
यंदा ओबीसीतील मराठा, माळी, मुस्लीम या बहुमतात असलेल्या समाज घटकातील कार्यकर्त्यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळावी यासाठी आपापल्या नेत्यांकडे मागणी सुरु केली आहे. पालिका स्थापनेनंतर वीस वर्षात एकदाही या समाज घटकाला नगराध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही. त्यामुळेच शहराचा दुसरा लोकनियुक्त नगराध्यक्ष कोण असेल याची नागरीकांमध्ये उत्सुकता लागुन आहे.
विरोधकांच्या एकीची साशंकतात
दरम्यान, या निवडणुकीत भाजप विरोधात सक्षमपणे लढण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र येतील काय? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. भाजपशी हातमिळवणी करणाºया नगरसेवकांबाबत मतदारांमध्ये निश्चीतच चांगली भावना नाही. भाजपने कोणत्याही प्रकारे सत्ता मिळविली असली तरी त्यामाध्यमातून त्यांनी केलेली विकासाची कामे ही त्यांची जमेची बाजू ठरत आहे.