कावळा : सृष्टीतील अन्नसाखळीचा एक भाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:13 IST2021-06-03T04:13:07+5:302021-06-03T04:13:07+5:30

लेखक : शिल्पा गाडगीळ, पक्षीमित्र, जळगाव भारतातील विविध भाषांतील लोकसाहित्यातून अनेक पशू-पक्ष्यांचा संदर्भ मिळतो. त्यातीलच एक कावळा. ...

Crow: A part of the food chain in creation | कावळा : सृष्टीतील अन्नसाखळीचा एक भाग

कावळा : सृष्टीतील अन्नसाखळीचा एक भाग

लेखक : शिल्पा गाडगीळ, पक्षीमित्र, जळगाव

भारतातील विविध भाषांतील लोकसाहित्यातून अनेक पशू-पक्ष्यांचा संदर्भ मिळतो. त्यातीलच एक कावळा. हा विविध भूमिकांत दिसून येतो. आपल्याकडे कावळ्याच्या दोन प्रजाती आढळतात. एक डोम कावळा (Large -billed Crow). निरीक्षणानुसार हा गाववेशीवर, स्मशान परिसर आणि तलावाकाठी दिसून येतो. भरवस्तीत हा दिसत नाही. याला अपवाद असू शकतो.

दुसरा जो सर्वदूर आढळतो तो कावळा (House Crow). हा मनुष्य वस्तीत राहणारा पक्षी. हा कावळा रानात सहसा दिसत नाही. तो

दिसला म्हणजे जवळपास कुठेतरी गाव, पाडा आहे, मनुष्यवस्ती आहे, असे खुशाल समजावे. हा पक्षी सर्वभक्षी आहे. जिवंत- मेलेले किडे, प्राणी, पक्षी, उष्टे- खरकटे सगळे खातो. छोटे- मोठे थवे करून राहणारा त्यामुळे याची संख्याही भरपूर आहे आणि आपल्या देशात सगळीकडेच हा कावळा आढळतो. या कावळ्याचे दिसणे, ओरडणे, त्याचा गलका, त्याची घरटे बांधण्याची पद्धत हे कुठला न्‌ कुठला तरी संदेश देतात, असा समज रूढ आहे. काही प्रमाणात कधी- कधी जुळतो, असे म्हणता येईल.

पितृपक्ष या काळात या पक्ष्याला घास देण्याची प्रथा आहे. कावळ्याला हा घास दिला म्हणजे आपल्या मृत आप्तांना तो पोहोचतो ही श्रद्धा आहे. ती वर्षानुवर्षे पाळली जाते. असा घास दिसला की, उपाशी कावळे झेपावतात व क्षणात घास पळवतात. खाऊन- खाऊन पोट भरले की, त्यांच्या फेऱ्या कमी होतात. आले तरी ते घासाला स्पर्श करीत नाहीत, की चोच लावीत नाहीत. मग आपली घालमेल सुरू होते. काही चुकले का? मग अनेक कबुल्या दिल्या जातात... हे करू... ते करू. चुकलो माफी असावी; पण घास खा.

आता मोठ्या शहरांमध्ये कावळे दिसत नाहीत. मग अशी दुकाने सुरू झाली. कावळ्याचे मानगूट पकडून त्याला बळजबरी खीर- वडे खायला लावायचे. तो घास आपले स्वर्गस्त आप्त स्वीकारतील का? व्रत, वैकल्ये, धार्मिक कार्य करताना पत्नी नसेल, तर पूजा करताना सुपारी ठेवतात, तसेच श्राद्धाच्या दिवशी कावळा नाही आला, तर दर्भाचा कावळा करून काकस्पर्श विधी पार पाडतात. मग नेहमीच असा दर्भाचा कावळा करावा, जिवंत कावळ्यांना कशासाठी त्रास द्यावा? या विधीसाठी आपल्या पूर्वजांनी कावळ्याचीच निवड करण्यामागे काय कारण असावे? यासंदर्भात असे एक कारण सांगितले जाते की, कावळे वड-पिंपळ या झाडांच्या बीज प्रसाराचे अनमोल काम करतात व पर्यावरणाला हातभार लावतात. हे ओळखून पितृपक्षात कावळ्यालाच घास घालायचा. हे पूर्णतः नाही पटले.

आपले पूर्वज द्रष्टे होतेच. त्यांनी सुरू केलेले अनेक सण-उत्सव आहेत, जे पर्यावरणाचे संरक्षण करणारे आहेत; पण बीज प्रसाराचे काम फक्त कावळेच करतात असे नाही. अनेक पक्षीच नाहीत, तर पशुपण आहेत बीजप्रसार करणारे. कडुनिंब, पिंपळ, वड याशिवाय अनेक वृक्षांच्या फळांच्या बिया या कठीण कवचाच्या असतात. अशी फळे- बिया जेव्हा पशू-पक्षी खातात तेव्हा त्याच्यावर त्यांच्या पोटात काहीतरी रासायनिक प्रक्रिया होऊन त्यांचे कठीण कवच मऊ होण्यास मदत होते. त्यांच्या विष्ठेतून बाहेर आलेल्या अशा बिया लवकर रुजतात. अनेक पक्षी त्यात धनेश (हॉर्न बिल)आहे, जो वड, पिंपळाची फळे आवडीने खातो. वटवाघूळसुद्धा बीज प्रसाराचे काम करतो. त्यामुळे कावळ्याला घास देण्याचा उद्देश बीज प्रसार आहे, पर्यावरणपूरक आहे. असा दावा पूर्वजांच्या माथी मारू नये. असे असताना घास मात्र कावळ्यालाच का? या बाबतीत निरीक्षण असे आहे की, कावळा हा बारा महिने आणि सर्व ऋतूंमध्ये हमखास आढळणारा, उपलब्ध असणारा आणि सर्वपरिचित असा पक्षी आहे. माणसाच्या अस्तित्वाला सरावलेला असल्याने तो न भिता जवळ येण्याची हिंमत करतो. शिवाय घास खाणारे अनेक पक्षी आहेत; पण चिमणीसारख्या लहान पक्ष्यांपेक्षा यांची भूक मोठी, थवा मोठा त्यामुळे त्यांना घास देत असावेत. आपल्याला कावळा जवळचा वाटला म्हणून पिंडाला काकस्पर्श महत्त्वाचा मानला गेला असावा. मानवी मनोव्यापार आणि पशू-पक्षी यांची सांगड काही ठिकाणी संयुक्तिक असेलही; पण कावळा हा सृष्टीतील अन्नसाखळीचा एक भाग, विशिष्ट परिसंस्थेशी निगडित एक सजीव म्हणून त्याच्याकडे बघायला हवे. मुळात हा आक्रमक असतोच. वेळ आली तर दुसऱ्याच्या चोचीतला घास पळवायलाही तो कमी करीत नाही. गायबगळ्याची जिवंत पिले घरट्यातून पळवून नेऊन त्यावर ताव मारणारे कावळे दरवर्षी दिसतात.

आपल्या संस्कृतीत कावळा महत्त्वाचा आहे. शुभ- अशुभ शकुनाची चाहूल देणारा. एकीकडे याची कावकाव पाहुणा येणार असे सांगते, तर कोलाहल मृत्यूचा संदेश देतो, असे म्हणतात. अनेक म्हणी- वाक्प्रचार याच्या नावावर आहेत. कावळा शिवला,

काकदृष्टी. अनेक गैरसमजही आहेत. यांनी बांधलेल्या घरट्याच्या उंचीवरून पर्जन्यमान कमी की जास्त, याचे अनुमान. पिंडाला कावळा शिवला नाही म्हणजे आत्मा अतृप्त राहतो वगैरे. कावळा काय किंवा अन्य पशू यांचे जीवनचक्र ठरावीक असते. दिवसभर अन्नाचा शोध, रात्री विश्रांती (निशाचर सोडून) माणसाच्या शुभ- अशुभाची त्यांना जाणीव नसते. माझे म्हणणे आहे की, प्रथा पाळायची; पण मूक जिवांना का त्रास? मूक प्राण्यांवर प्रेम करा, असे आपली संस्कृती सांगते, त्याचा आपल्याला का विसर पडतो? मूळ आशियाई असलेली ही जात आता जगभर पसरली आहे. ती जतन करण्याची गरज आहे. त्यांचा नैसर्गिक अधिवास, त्यांचे अन्न, त्यांचे प्रजनन बिनधोक व्हावे यासाठी प्रयत्न करायचे सोडून, जो दिसेल त्याला दावणीला बांधायचे, हे ब्रीद. प्रत्येक वेळी पूर्वजांनी सांगितले म्हणून ते योग्य, असा दाखला देतो. पूर्वजांनी बऱ्याच हितकारी गोष्टी सांगितल्या, त्यातल्या किती पाळतो? हाही एक प्रश्नच आहे.

Web Title: Crow: A part of the food chain in creation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.