विघ्नहर्त्याच्या स्वागत व विसर्जन मार्गावर खड्ड्यांचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:20 IST2021-09-05T04:20:49+5:302021-09-05T04:20:49+5:30
सचिन देव जळगाव : पुढील आठवड्यात विघ्नहर्ता गणरायाचे आगमन होणार आहे. गणरायाच्या स्वागताची वाट ही बिकट रस्त्यांनी होणार असल्याचे ...

विघ्नहर्त्याच्या स्वागत व विसर्जन मार्गावर खड्ड्यांचे संकट
सचिन देव
जळगाव : पुढील आठवड्यात विघ्नहर्ता गणरायाचे आगमन होणार आहे. गणरायाच्या स्वागताची वाट ही बिकट रस्त्यांनी होणार असल्याचे दिसत असताना, दुसरीकडे विसर्जन मार्गाची वाटही अत्यंत खडतर असल्याचे शनिवारी `लोकमत` प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून दिसून आले. मनपा इमारतीपासून ते मेहरूण तलावापर्यंतच्या रस्त्याच्या केेलेल्या पाहणीत लहान-मोठ्यांसह २५० हून अधिक खड्डे दिसून आले आहेत. विशेष म्हणजे काही ठिकाणी १० ते १५ सेंटिमीटरपर्यंतचे खड्डे पडलेले दिसून आले. या खड्ड्यांतून वाहन काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. ईच्छादेवी चौफुली ते गायत्री नगरपर्यंतचा रस्ता पूर्णत: खड्ड्यात गेलेला आहे.
इन्फो :
भिलपुरा पोलीस चौकीसमोर दहा खड्डे
‘लोकमत’ प्रतिनिधी महापालिकेच्या इमारतीसमोरून निघाल्यानंतर टॉवर चौक, चौबे मार्केट चौक व भिलपुरा चौकात दाखल झाले. या चौकात रस्त्याच्या मधोमध साधारणतः २५ ते ३० फुटांच्या अंतरात ठिकठिकाणी दहा खड्डे पडलेले दिसून आले, तर रस्त्याच्या साईडपट्ट्याही पूर्णतः खराब झालेल्या दिसून आल्या. विशेष म्हणजे या खड्ड्यांमधून मोठ्या प्रमाणावर दगड-गोटे वर आल्यामुळे वाहनधारकांना या खड्ड्यांमधून वाहन काढताना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच या चौकात रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध प्रकारच्या विक्रेत्यांच्या हातगाड्या लागल्यामुळे या कोंडीत अधिकच भर पडताना दिसून आली. त्यामुळे गणेश विसर्जन मार्गावरील हा चौक अधिकच धोकादायक ठरत आहे.
इन्फो :
बालाजी पेठेत जागोजागी खड्डे
भिलपुरा चौकीपासून पुढे बळिराम पेठ मार्गे बालाजी पेठकडे जाताना रस्त्यात मोठमोठे पाच ते सहा खड्डे दिसून आले. तसेच अमृतच्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्ता खालीवर झालेला दिसून आला. दरम्यान, या ठिकाणाहून बालाजी पेठेकडे जाताना रस्त्याच्या सुरुवातीलाच खड्डे दिसून आले. विशेष म्हणजे येथील बालाजी मंदिरासमोरच १५ ते २० खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यात पावसाचे पाणी तुंबल्यामुळे मोठ्या प्रमाणावर चिखल झालेला दिसून आला. तसेच या रस्त्यावरून पुढे रथ चौकाकडे जाताना या संपूर्ण रस्त्यावर ५० ते ६० खड्डे दिसून आले.
इन्फो :
बेंडाळे चौक ते सिंधी कॉलनी रस्त्यावर १०० ते १२५ खड्डे
बालाजी पेठेतून पुढे रथ चौकाकडून बेंडाळे चौकापर्यंत २० ते २५ ठिकाणी खड्डे दिसून आले, तर पुष्पलता बेंडाळे चौकापासून ते पांडे चौक, पंचमुखी हनुमान मंदिरमार्गे सिंधी कॉलनीपर्यंत १०० ते १२५ लहान-मोेठे खड्डे दिसून आले. विशेष म्हणजे या मार्गावर ५ ते १५ सेंटिमीटरपर्यंत खड्डे पडलेले दिसून आले. या खड्ड्यांमधून ठिकठिकाणी दगड-गोटे वर आले आहेत. खड्ड्यात नजरचुकीने चाक गेल्यास, वाहन पलटण्याची भीती असल्यामुळे अनेक वाहनधारक खड्डे चुकविताना दिसून आले.