अमळनेरात सुमारे ४० हजार हेक्टरात दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST2021-07-18T04:13:18+5:302021-07-18T04:13:18+5:30

हवामान खात्याचा अंदाज पूर्णपणे बारगळल्याने अमळनेर तालुक्यातील एकूण ५४ हजार ९८ हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे ४१ हजार हेक्टर जिरायत क्षेत्रावर ...

Crisis of double sowing in about 40,000 hectares in Amalnera | अमळनेरात सुमारे ४० हजार हेक्टरात दुबार पेरणीचे संकट

अमळनेरात सुमारे ४० हजार हेक्टरात दुबार पेरणीचे संकट

हवामान खात्याचा अंदाज पूर्णपणे बारगळल्याने अमळनेर तालुक्यातील एकूण ५४ हजार ९८ हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे ४१ हजार हेक्टर जिरायत क्षेत्रावर यंदा दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवले आहे. मृग नक्षत्राची पेरणी सर्वोत्तम गणली जाते व यंदा १०० टक्के पावसाच्या भविष्यवाणीवर विसंबून तालुक्यात जिरायत शेतीत २८४७६ हेक्टर कापूस लागवड, ६ हजार ७९४ हेक्टर मका, १५४४ हेक्टर ज्वारी, ११२४ हेक्टर बाजरी, मूग १३३१ हेक्टर, उडीद ४९४ हेक्टर, भुईमूग २०३ हेक्टर, सोयाबीन ८४ हेक्टर व इतर पिके मिळून ४१ हजार ३९१ हेक्टर क्षेत्रात मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी पेरणी, लागवड करून नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला. पण जवळपास दीड महिन्यापासून पेरलेल्या क्षेत्रावर पाऊस पडलाच नाही. कोंब कोमेजून जमिनीतच गाडले गेले. बी-बियाणे, खते, मजुरीवर केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला.

पिकात केला बदल.

नगदी पीक म्हणून गणले जाणारे कापूस पीक हे आठमाही पीक असून, दीड महिना उशिर झाल्यामुळे आता कापूस उत्पादनाची आशा मावळली. अमळनेर तालुक्यात १२ जुलैपासून कमी जास्त प्रमाणात तुरळक स्वरूपात का असेना, पण पावसाने हजेरी लावली. पहिली पेरणी वाया गेली. दुबार पेरणीत आता शेतकऱ्यांनी अल्प मुदतीची पिके मका, बाजरी, सूर्यफुल अशा पिकांना पसंती दिली आहे. सुमारे ९० दिवसांच्या कालावधीची ही पिके निघाल्यावर त्यावर हरभरा, करडई, गहू यासारखी पिके घेता येतील.

बागायती क्षेत्रावरही परिणाम

तालुक्यात सुमारे १२ हजार १२७ हेक्टर क्षेत्रात बागायती कापूस, १५२ हेक्टरात पपई, २६७ हेक्टर क्षेत्रात फळफळावळ, भाजीपाला तर १६१ हेक्टर केवळ गुरांसाठी खोंडे, चारा म्हणून मे महिन्यात ठिबक सिंचनावर लागवड आहे. लागवडीनंतर एक महिन्यापर्यंत विहिरीची क्षमता टिकून राहिली. जून महिना कडक तापमानात गेल्याने, विहिरींची पातळी खालावून, पिकांची वाढ खुंटू लागली आहे. अजून पाहिजे तसा पाऊसच झालेला नाही. नद्या नाले कोरडेच आहेत. पाऊस आता येईल या आशेने शेतकऱ्यानी दुबार लागवड व पेरणीस सुरुवात तर केली पण भविष्य अंधारातच आहे.

Web Title: Crisis of double sowing in about 40,000 hectares in Amalnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.