लेखनाचं श्रेय आई-वडिलांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:12 AM2018-06-05T00:12:09+5:302018-06-05T00:12:09+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात चाळीसगाव येथील विश्वास देशपांडे यांनी सांगितलेली आपल्या लेखनामागील प्रेरणा.

 Credit for Parents | लेखनाचं श्रेय आई-वडिलांना

लेखनाचं श्रेय आई-वडिलांना

Next

लेखन प्रेरणेचे श्रेय मी माझ्या आईवडिलांना देईन. त्यांनी लहानपणापासून मला वाचनाची गोडी लावली. माझे प्राथमिक शिक्षण एका अगदी छोट्याशा खेडेगावात झाले. तिथे रोजचे वर्तमानपत्रसुद्धा येत नव्हते. पण मी ज्या शाळेत शिकत होतो त्या शाळेला माझ्या काकांनी त्या काळात म्हणजे सुमारे ५५ वर्षांपूर्वी पुस्तके घेण्यासाठी एक हजार रुपये दिले होते. त्या काळात एक हजार रुपयात भरपूर पुस्तके आली. तशी आधीचीही काही पुस्तके त्या वाचनालयात होती. मी दररोज तेथून एक पुस्तक घेऊन वाचत असे. सातवी होईपर्यंत त्या शाळेतील जवळपास सर्व पुस्तके माझी वाचून झाली होती.
पुढे शिक्षणासाठी चाळीसगावला आलो. तेव्हा वडिलांनी शेती सोडून येथील कॉलेजमध्ये लायब्ररीत उपजीविकेसाठी नोकरी धरली. त्यांनाही वाचनाची आवड होती. त्यामुळे मी हायस्कूलमध्ये असतानाच मला विविध लेखकांची पुस्तके वाचायला मिळू लागले. तेव्हा विविध ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक कादंबऱ्या, चरित्रे आदींचे वाचन होऊ लागले. पुढे कॉलेजला गेल्यानंतर वाचनात अधिक भर पडत गेली. मग दरवर्षी प्रकाशित होणाºया कॉलेजच्या नियतकालिकात लिहू लागलो. काही कविता लिहिल्या. त्यातील काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या. पुढे शिक्षक म्हणून काम करीत असताना अनेक विषयांवर बोलण्याचा प्रसंग आला. त्यानिमित्ताने पुन्हा वाचन होत गेले. असे वाचनाने मला समृद्ध केले. पुस्तके माझी जीवलग मित्र झाली. कोठेही गेलो आणि चांगले पुस्तक दिसले की मी ते विकत घेत असे.सेवानिवृत्तीनंतर मला लिहिण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध झाला. भोवताली घडणाºया काही घटना, सामाजिक प्रश्न मला अस्वस्थ करीत होते. त्यावर वाचकांशी संवाद साधावा असे वाटू लागले. मग व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियाचा आधार घेऊन माझे लेख प्रभातपुष्प या शीर्षकाखाली वाचकांपुढे ठेवू लागलो. वाचकांना ते आवडू लागले. लवकरच माझा एक वाचकवर्ग तयार झाला. काही लेख वर्तमानपत्रातही प्रसिद्ध झाले. पुढे लवकरच माझ्या वाचकांच्या आग्रहाखातर ते लेख पुस्तक रूपाने प्रसिद्ध करायचे ठरवले. पुण्यातील विश्वकर्मा प्रकाशनाने त्यांचे पुस्तक ‘कवडसे सोनेरी..अंतरीचे’ या नावाने प्रसिद्ध केले. या पुस्तकाला प्रा.प्रवीण दवणे यांची प्रस्तावना आहे. नुकतेच हे पुस्तक दीपस्तंभचे यजुर्वेंद्र महाजन आणि प्रसिद्ध वक्ते प्रा.प्रकाश पाठक यांच्या हस्ते प्रकाशित झाले.
- विश्वास देशपांडे

Web Title:  Credit for Parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.