सहकारी संस्थांची ‘पत’ घसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:43 IST2020-12-04T04:43:07+5:302020-12-04T04:43:07+5:30
सहकारात स्वाहाकार लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बीएचआर पतसंस्थेच्या निमित्ताने जिल्ह्यातील इतर पतसंस्था पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. काही ...

सहकारी संस्थांची ‘पत’ घसरली
सहकारात स्वाहाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बीएचआर पतसंस्थेच्या निमित्ताने जिल्ह्यातील इतर पतसंस्था पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. काही वर्षांपुर्वी जिल्ह्यात पतसंस्था आणि सहकारी संस्थांचे लोण आले होते. मात्र संचालक मंडळाच्या मर्जीतील लोकांना कर्ज वाटप, त्याची योग्य वसुली न होणे यामुळे जिल्ह्यात असलेल्या १३ पैकी ८ अर्बन बँकांवर अवसायक आहेत. तर तब्बल ११० पतसंस्था या आर्थिक अडचणीत आल्या असल्याची माहिती सहकार विभागाच्या आकडेवारीतून समोर आली आहे.
जिल्ह्यातील काही सहकारी पतसंस्थांनी आपली पत ही जिल्ह्याच्या बाहेरही वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये नवीन शाखा सुरू केल्या. त्यानंतर तेथील खान्देशी लोकांना एकत्र करून त्यांच्या ठेवी घेतल्या. आणि त्याचे आर्थिक नियोजन नीट न केल्याने या संस्था अडचणीत आल्या आहेत. त्यांच्या कोट्यवधींच्या मालमत्ता देखील कवडीमोल भावाने जवळच्या लोकांना विकल्या गेल्याचेही समोर आले आहे. अशाच विविध कारणांमुळे जिल्ह्यातील तब्बल ८ नागरी सहकारी बँका अवसायनात गेल्या आहेत. तर ६१२ पतसंस्थांपैकी ११० संस्थांची पत घसरली आहे. या संस्था आर्थिक अडचणीत आल्या आहेत.
३७ पतसंस्थांवर प्रशासक आहेत. तर ५४ पतसंस्था या अवसायकांच्या हाती सोपवण्यात आल्या आहेत.
ऑडिट वेळवरच - जिल्हा उपनिबंधक
जिल्ह्यातील सर्व सहकारी पतसंस्था किंवा नागरी बँक यांचे ऑडीट वेळेवर होते, असा दावा जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांनी दिली आहे.
नवीन पतसंस्थांची नोंदणी नाही
यंदाच्या चालु वर्षात नवीन पतसंस्थांची नोंदणी करण्यात आलेली नाही. मात्र सहकार कायद्याच्या कलम ८३ अंतर्गत १५ नवीन सहकारी संस्था मात्र प्रस्तावित आहे. पतसंस्थांच्या नोंदणीचे अधिकार हे सहकार आयुक्तांना आहेत. मात्र यंदा जिल्ह्यात एकही नवीन पतसंस्था नोंदणी झालेली नाही. तर ९ सहकारी संस्थांची नोंदणी आतापर्यंत झाली आहे.
आकडेवारी
एकुण नागरी बँका - १३
कार्यरत बँका - ५
अवसायनात असलेल्या ८
पतसंस्था एकुण ६१२
आर्थिक अडचणीत आलेल्या ११०
प्रशासक असलेल्या ३७
अवसायनात असलेल्या ५४