शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

सृष्टी आणि जीवनवैभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:13 IST

या रम्य, प्रसन्न वातावरणात मला शाळेच्या पाठ्यपुस्तकात असलेली कवी शांताराम आठवले यांनी लिहिलेली ‘सृष्टी वैभव’ ही कविता आठवली. ही ...

या रम्य, प्रसन्न वातावरणात मला शाळेच्या पाठ्यपुस्तकात असलेली कवी शांताराम आठवले यांनी लिहिलेली ‘सृष्टी वैभव’ ही कविता आठवली. ही कविता विशेषत्वाने आठवण्याचे आणखी कारण म्हणजे, माझे वडील ही कविता मूळ चालीनुसार सुंदर आवाजात गात असत. ‘कुंकू’ चित्रपटात एक गाणे म्हणून ही कविता घेतली आहे, हेही मला त्यांच्याकडूनच तेव्हा समजले होते.

सकाळच्या सुंदर वातावरणात मला प्रकर्षाने ती कविता आठवली आणि वास्तव सृष्टीसौंदर्याचा, त्या कवितेतील सृष्टिवर्णनाचा आणि आपला जीवन वैभवाचा संबंध शोधण्याचा मी प्रयत्न करू लागले. आश्चर्य म्हणजे प्रत्यक्ष सृष्टीचे बदलत जाणारे सौंदर्य कवीने सूक्ष्म निरीक्षणाने कवितेत किती हुबेहूब साकारले आहे हे तर मला कळलेच; पण आपल्या जीवनाशीही याचा काहीतरी संबंध नक्कीच आहे, हेही लक्षात आले.

वसंत ऋतूमध्ये वृक्षवेलींना फुटणारी हिरवी कोवळी पालवी पाहिल्यावर मन प्रसन्न होते. मरगळलेल्या साऱ्या सृष्टीला जणू चैतन्य येते, ती टवटवीत उल्हसित होते. चैत्र, वैशाख महिन्यांत वारे वाहू लागतात. हे वाऱ्यांचे वाहणे म्हणजे पर्जन्यराजाच्या आगमनाची नांदीच जणू काही.

गातात संगीत पृथ्वीचे भाट

चैत्र वैशाखाचा ऐसा हा थाट

या शब्दांत कवीने हे वर्णन केले आहे.

ज्येष्ठ, आषाढ महिन्यांत आकाशात काळे ढग दाटून येतात. अधूनमधून विजा चमकतात. ढगांचा गडगडाट ऐकू येतो आणि पावसाला सुरुवात होते.

घालाया सृष्टीला मंगल स्नान

पूर अमृताचा सांडे वरून

गगनी नर्तन कृष्ण मेघांचे

भूतली मयूर उत्तान नाचे

सृष्टीचे हे चैतन्यमय, उल्हसित रूप पाहून अमृतरूपी पाऊस तिला जणू पवित्र स्नान घालत आहे, अशी इथे कल्पना आहे. त्याच वेळी आकाशात काळ्या मेघांचे आणि पृथ्वीवर आनंदविभोर अशा मोराचे नृत्य सुरू आहे, असे चित्र कवीने साकार केले आहे.

श्रावण महिना तर सगळ्यांनाच आवडणारा. सृष्टीचे रूप या महिन्यात अधिकच खुलून दिसते. याच महिन्यात मंगळागौर, गोकुळाष्टमी, नागपंचमी, पोळा, असे विविध सण येतात. सृष्टीतल्या आल्हाददायक वातावरणामुळे अतिशय आनंदाने, उत्साहाने सारे जण हे सण साजरे करण्यासाठी उत्सुक असतात. शेतकऱ्यांची पोळ्याची तयारी जोरात सुरू होते. गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडीच्या तालमी, गोपाळ काल्याची तयारी ही लगबग सुरू होते. नागपंचमीच्या निमित्ताने नागोबाच्या पूजेची तयारी, झाडांना झोके बांधणे सुरू होते.

हे वर्णन कवीने

श्रावणी पाऊस हास्याचा पडे

श्रीकृष्ण जन्माची दंगल उडे

बांधिती वृक्षांना रम्य हिंदोळे

कामिनी धरणी वैभवी लोळे

या समर्पक शब्दांत केले आहे.

आज ही कविता वाचून, ऐकून कितीतरी वर्षे लोटली; पण अजूनही या कवितेची मोहिनी कित्येक रसिकांच्या मनावर आहे.

सृष्टीचे हे चक्र अव्याहतपने सुरू असले तरी आता त्यात खूपच अनियमितता आलेली दिसते. कधी अवकाळी पाऊस, कधी मोठमोठाली जीवघेणी वादळे, कुठे अतिवृष्टी, ओला दुष्काळ, महापूर, तर कुठे कोरडा दुष्काळ, त्यामुळे मानवाला आलेले नैराश्य, हतबलता. असे असूनही अथक प्रयत्न करून प्रसंगी प्राणांची बाजी लावून मानव या संकटांशी शर्थीने झुंज देऊन संघर्षावर मात करताना दिसतो आहे. माणसाची जीवन जगण्याची ऊर्मीच यासाठी कारणीभूत ठरली आहे.

कितीही संकट आली, तरी जीवन जगणे आणि जगण्यातला आनंद घेणे खूप महत्त्वाचे आहे. वैशाख वणव्याने होरपळलेली सृष्टी आषाढ, श्रावणात चैतन्यमय होते, सारे वातावरण प्रफुल्लित करून टाकते. आपणही या सृष्टीकडून, निसर्गाकडून कळत- नकळत हेच शिकले पाहिजे.

आपल्या मित्र-मैत्रिणीजवळ आपली सुख- दुःखे आपल्याला मोकळी करता आली पाहिजेत. आपल्याजवळ असलेल्या कला, विविध छंद आपण जोपासायला हवेत. आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या ओझे म्हणून न बाळगता कर्तव्य म्हणून आस्थेने, आनंदाने त्या पार पाडल्याचे समाधान आपण मिळवायला हवे. सृष्टीला नवचैतन्य आणण्यासाठी जशा निसर्गातल्या काही गोष्टी कारणीभूत ठरतात तशाच आपल्या जीवनात आनंद, उत्साह आणण्यासाठी या काही गोष्टी कारणीभूत ठरतात. अभिजात संगीत आपली मन:स्थिती उत्तम करतेच. तसे अभिजात साहित्यही आपले जीवन उन्नत करतेच. आपल्या सभोवताली असलेल्या अनेक गोष्टींमधून आनंद घेतला, तर आपल्या जीवनातही ऊर्मी आणि चैतन्य निर्माण होईल आणि आपले जीवन सृष्टीतील वैभवाप्रमाणे नक्कीच वैभवशाली होईल, हे काय सांगायला हवे? कधी नव्हे तो सूर्योदयापूर्वी फिरायला गेल्याचा आनंद या विचारांनी मिळाला, तो वेगळाच.

-प्रा. डॉ. चारुता गोखले, जळगाव