शहराचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:12 IST2021-07-15T04:12:54+5:302021-07-15T04:12:54+5:30
केंद्राच्या समितीने मनपा प्रशासनाला दिल्या सूचना : शहराच्या प्रदूषणाबाबत व्यक्त केली नाराजी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील वातावरणात ...

शहराचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा
केंद्राच्या समितीने मनपा प्रशासनाला दिल्या सूचना : शहराच्या प्रदूषणाबाबत व्यक्त केली नाराजी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील वातावरणात मोठ्या प्रमाणात धूलिकणांचे प्रमाण वाढत असून, हवेची गुणवत्तादेखील खराब होत आहे. यावर आता केंद्राच्या समितीनेदेखील नाराजी व्यक्त केली असून, शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी लवकरात लवकर ॲक्शन प्लॅन तयार करण्याचा सूचना केंद्राच्या समितीने मनपा प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच लवकरात लवकर हवेचे प्रदूषण कसे कमी होईल यावर चांगल्या पद्धतीने काम करण्याचा सूचनाही या समितीच्या सदस्यांनी मनपा प्रशासनाला दिल्या आहेत.
केंद्राच्या शहरी विकास मंत्रालयाकडून समितीने मंगळवार व बुधवार हे दोन दिवस मनपाला भेट दिली. या समितीमध्ये केंद्र शासनाच्या शहरी विकास मंत्रालयातील एका नोडल अधिकाऱ्यासह प्रदूषण महामंडळ व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या काही प्राध्यापकांचादेखील समावेश होता. या समितीच्या सदस्यांनी मंगळवारी मनपा उपायुक्त प्रशांत पाटील यांच्याशीदेखील चर्चा केल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.
हवेची गुणवत्ता सुधारा, केंद्राकडून फंड घ्या
जळगाव शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत आहे. यावर मनपा प्रशासनाने काम करण्याची गरज आहे, अशा सूचना या समितीच्या सदस्यांनी दिल्या. तसेच मनपा प्रशासनाने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी चांगले काम केले व येत्या काही महिन्यांत तसे बदल जाणवले तर शासनाकडून मिळणाऱ्या वेगवेगळ्या फंडाचा लाभदेखील महापालिकेला मिळू शकतो, असेही या समितीतील सदस्यांनी मनपा अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
हवेची गुणवत्ता या कारणांमुळे झाली खराब
१. शहरात गेल्या काही वर्षांपासून अमृत अंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. यामुळे उडणाऱ्या धुळीमुळे झाला परिणाम.
२. शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब झाली असून, या खराब रस्त्यांमुळे धूलिकणांच्या प्रमाणात झाली वाढ.
३. शहरात गेल्या काही वर्षांत नवीन बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्याचाही झाला परिणाम.
४. यासह मनपाचा घनकचरा प्रकल्पाचे कामदेखील ९ वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे या ठिकाणच्या लाखो टन कचऱ्याला आग लागत असून, आगीतून निघणाऱ्या धुरामुळे हवेची गुणवत्ता खराब होत आहे.
घनकचरा प्रकल्पाची केली पाहणी
समितीच्या सदस्यांनी बुधवारी मनपाच्या आव्हाणे शिवारातील बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तसेच अनेक वर्षांपासून हे काम बंद असल्याचे कळल्यानंतर समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. लवकरात लवकर हे काम सुरू करण्याचा सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या.