१४ हजारांवर डॉक्टर, कर्मचाऱ्यांना कोविड लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:29 IST2020-12-03T04:29:11+5:302020-12-03T04:29:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविडच्या प्रादूर्भावात रुग्णसेवा करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांना लस देण्यासंदभार्त माहितीचा जिल्हाधिकारी अभिजित ...

१४ हजारांवर डॉक्टर, कर्मचाऱ्यांना कोविड लस
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविडच्या प्रादूर्भावात रुग्णसेवा करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांना लस देण्यासंदभार्त माहितीचा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आढावा घेतला. जिल्हयातील शासकीय, खासगी यंत्रणेतील १४ हजार डॉक्टर आणि पॅरा मेडीकल स्टाफ यांना प्रत्येकी दोन डोस असे या लसीचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, अद्याप २२ टक्के खासगी रुग्णालयांकडून माहिती उपलब्ध झालेली नाही.
कोरोना लस आल्यानंतर ती फ्रंटवर लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरूवातीला देण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्याकडून शासकीय, खासगी आरोग्य यंत्रणेत नेमके किती मणुष्यबळ आहे, किती लस लागणार याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली. सद्यस्थितीत १४ हजार डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची माहिती असून
यात एक हजारापर्यंत वाढ होण्याची शक्यता असल्याने साधारण १५ हजारांपर्यंत ही संख्या जावू शकते, असे सांगण्यात आले. दरम्यान, खासगी यंत्रणेकडून माहिती प्राप्त होत नसल्याचा प्रकार मध्यंतरीही समोर आला होता. त्यामुळे आहे ती माहिती शासनाकडे पाठविण्यात आली असून आता इंडियन मेडिकल असोसिएशनला खासगी रुग्णालयांनी तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. खासगी यंत्रणांनी लवकर पुढे येऊन ही माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार, महापालिकेचे प्रमुख आरोग्य अधिकारी डॉ. राम रावलानी आदी उपस्थित होते.
पुढील आठवड्यात नॉन कोविड?
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नॉन कोविड सुविधा सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. येत्या आठवडाभरात नॉन कोविडची सुविधा सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे याबाबत संभ्रमावस्था असल्याचेही चित्र निर्माण झाल्याची स्थिती आहे. कारण नॉन कोविड केल्यानंतर अचानक रुग्णवाढल्यास मग काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात चित्र बघून एकत्रित आढावा घेऊनच हा निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.