शेत शिवारात कपाशीचे पीक उपटून फेकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:16 IST2021-09-03T04:16:44+5:302021-09-03T04:16:44+5:30
वरखेडी, ता. पाचोरा : सावखेडा बु. शेतशिवारात पिंपळगाव ते वरखेडी रस्त्याला लागूनच असलेल्या लासुरे येथील भैय्यासाहेब दयाराम पाटील यांच्या ...

शेत शिवारात कपाशीचे पीक उपटून फेकले
वरखेडी, ता. पाचोरा : सावखेडा बु. शेतशिवारात पिंपळगाव ते वरखेडी रस्त्याला लागूनच असलेल्या लासुरे येथील भैय्यासाहेब दयाराम पाटील यांच्या शेतात उगवलेले कपाशीचे पीक उपटून फेकले असून याप्रकरणी शेतकऱ्याने तिघा संशयितांवर संशय व्यक्त केला आहे.
ठिबक संचावर लागवड केलेले राशी सीड्स कंपनीचे निवो व राशी ६५९ तसेच आता एका झाडावर ५० ते ६० कैऱ्या पक्क्या झालेली साडेतीन ते चार फूट उंचीची झाडे असलेल्या साडेतीन एकरातील कपाशीचे पीक ३१ ऑगस्ट रोजी रात्री संशयित आकाश रमेश परदेशी (वाकडी, ता. सोयगाव), दीपक बाबूलाल परदेशी, विजय बाबूलाल परदेशी (दोघे रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा) यांनी उपटून सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान केले, अशी फिर्याद पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात भैय्यासाहेब दयाराम पाटील यांनी दिली आहे.
या तिघा संशयितांविरुद्ध भादंवि कलम ४४७, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. काॅ. विजय माळी हे करीत आहेत. ही घटना भैय्यासाहेब पाटील यांचा मुलगा शुभम याच्या १ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शेतात चक्कर मारण्यासाठी गेला असता लक्षात आली. घटनेची माहिती त्यांने वडिलांना फोनवरून दिली. यातून नुकसान झालेल्या कपाशीच्या झाडांची पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. ही घटना जुन्या वादातून झाली असावी अशी चर्चा आहे.
छाया - हेमशंकर तिवारी, वरखेडी