वरिष्ठांनी झापल्याने नगरसेवक अडचणीत
By Admin | Updated: June 9, 2014 14:07 IST2014-06-09T14:07:56+5:302014-06-09T14:07:56+5:30
वरिष्ठांना विश्वासात न घेताच मनपातील सत्ताधारी खाविआचा पाठिंबा काढून घेत असल्याचे पत्रक काढण्यामागे खाविआवर दबाव आणून पद पटकाविण्याची काही नगरसेवकांची इच्छाच कारणीभूत असल्याचे समजते.

वरिष्ठांनी झापल्याने नगरसेवक अडचणीत
>राष्ट्रवादीची धडपड : उपमहापौरपदावरून समितीच्या सभापतीपदावर तडजोडीची तयारी
जळगाव : वरिष्ठांना विश्वासात न घेताच मनपातील सत्ताधारी खाविआचा पाठिंबा काढून घेत असल्याचे पत्रक काढण्यामागे खाविआवर दबाव आणून पद पटकाविण्याची काही नगरसेवकांची इच्छाच कारणीभूत असल्याचे समजते. मात्र याबाबत पक्षाच्या वरिष्ठांनी झापल्यावर अडचणीत आलेल्या या नगरसेवकांनी विविध समित्यांच्या सभापतीपदांवर तडजोड करण्याची तयारी दर्शविली असल्याचे समजते.
तर राष्ट्रवादीतील काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामागे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतील इच्छुकांचा मार्ग मोकळा करण्याचे डावपेच असल्याचे सांगितले जात आहे.
मनपाची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यावरील सर्व उपाययोजना राज्य शासनाच्या विरोधात गेलेल्या निर्णयांमुळेच रखडल्या आहेत. या परिस्थितीची जाणीव राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. त्यामुळे गटनेते व नगरसेवकांची कुठल्याही वरिष्ठ नेत्याची परवानगी न घेता वॉर्डात कामे होत नसल्याचे निमित्त पुढे करून पाठिंबा काढण्याचे पत्र देण्यामागे पदांची लालसा हेच कारण असल्याचे सांगितले जात आहे. आधी उपमहापौर व स्थायी समिती सभापती या पदांची मागणी करण्यात आली होती. मात्र परस्पर पाठिंबा काढण्याचे पत्र दिल्याच्या घडामोडींची माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानी गेल्यावर त्यांनी या हालचालीच्या सूत्रधारांना फैलावर घेतल्याचे समजते. त्यामुळे अडचणीत आलेले नगरसेवक आता समित्यांच्या सभापतीपदांवर तडजोड करण्याच्या मानसिकतेत आले असल्याचे खात्रिलायकरित्या समजते.
तर अन्य सूत्रांकडून मात्र विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या एका उमेदवाराच्या मार्गातील अडथळा दूर व्हावा, यासाठी खाविआचा पाठिंबा काढण्याच्या हालचालींची खेळी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
विशेष म्हणजे जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक यांनीच ५ रोजी सकाळी ११ वाजता ही बैठक बोलावली होती. त्याच दिवशी कोर्टातही तारीख होती. ते काम आटोपून सायंकाळी ते मुंबईला रवाना झाल्याचे समजते.