गुन्हेगारांच्या टोळीवर हद्दपारीच्या कारवाईसाठी नगरसेविकेचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:18 IST2021-09-03T04:18:33+5:302021-09-03T04:18:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भुसावळात गुन्हेगारांच्या एका टोळीने प्रचंड दहशत माजविली असून, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. या ...

गुन्हेगारांच्या टोळीवर हद्दपारीच्या कारवाईसाठी नगरसेविकेचे उपोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भुसावळात गुन्हेगारांच्या एका टोळीने प्रचंड दहशत माजविली असून, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. या टोळीवर येत्या आठ दिवसांत हद्दपारीची कारवाई व्हावी, या मागणीसाठी गुरुवारी भुसावळ येथील नगरसेविका पूजा सूर्यवंशी यांच्यासह काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
भुसावळ शहरातील एका गुन्हेगारांच्या टोळीचा हद्दपारीचा प्रस्ताव पाच ते सहा महिन्यांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, त्यावर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. दुसरीकडे टोळी प्रमुखाची पत्नी ही राजकीय व्यक्ती असून, ती राजकीय बळाचा वापर करून पोलीस प्रशासनावर दाबाव आणून हद्दपारीचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप नगरसेविका सूर्यवंशी यांनी निवेदनातून केला आहे. त्यातच दोन महिन्यांपासून अनेकवेळा निवेदन देऊन कुठलीही कारवाई न झाल्यामुळे गुरुवारी नगरसेविकेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण पुकारले होते. तसेच येत्या आठ दिवसांत त्या टोळीला हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. कारवाई न झाल्यास येत्या १३ सप्टेंबर रोजी नाशिक येथील पोलीस आयुक्तालय कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाईल, असा इशाराही नगरसेविका पूजा सूर्यवंशी यांनी दिला आहे.