मनपाची सुस्ती, पाणी असलेल्या खड्ड्यात डांबर टाकून केली दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:21 IST2021-09-15T04:21:10+5:302021-09-15T04:21:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात महापालिका प्रशासनाकडून रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु असून, हे काम अत्यंत सुमार दर्जाचे होत ...

मनपाची सुस्ती, पाणी असलेल्या खड्ड्यात डांबर टाकून केली दुरुस्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात महापालिका प्रशासनाकडून रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु असून, हे काम अत्यंत सुमार दर्जाचे होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील डीमार्ट परिसरातील रस्त्यावर पाणी असलेल्या खड्ड्यातच डांबर टाकून रस्त्याची तकलादू दुरुस्तीचे काम उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे हे काम आमदार सुरेश भोळे यांनीच उघडकीस आणले असून, अशा सुमार दर्जाच्या कामामुळे रस्त्यांचा त्रास वाढत जात असल्याची माहिती आमदार भोळे यांनी दिली आहे.
शहरात मनपा प्रशासनाने ऐन पावसाळ्यात रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मात्र, अनेक ठिकाणी हे कामे केवळ नावालाच केली जात असल्याचे आढळून येत आहे. आमदार सुरेश भोळे यांनी मंगळवारी शहरातील विविध भागात सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. या पाहणी दरम्यान, शिरसोली रस्त्यालगत एका ठिकाणी रस्त्यांवरील खड्ड्यातील पाणी न काढताच त्यामध्ये डांबर टाकला जात असल्याचा प्रकार आमदार भोळे यांच्यासमोर घडला. आमदारांच्या समोरच असे प्रकार घडत असतील तर या रस्त्यांचा दुरुस्तीवरील मनपाचा खर्च वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मनपा अभियंता काम सोडून, मेहरूण तलावावर
आमदार भोळे यांनी मनपाकडून सुरु असलेल्या ढिसाळ कामाचे पितळ उघडे पाडल्यानंतर या कामाची जबाबदारी असलेले मनपाचे अभियंते आहेत तरी कोठे ? असा प्रश्न मनपा कर्मचाऱ्यांना विचारला. आमदारांनी मनपा आयुक्तांनाच याबाबत विचारणा केल्यानंतर काही वेळात मनपा अभियंते कामाच्या ठिकाणी हजर झाले. मनपाचे अधिकारी व अभियंता कामाच्या ठिकाणी न थांबता मेहरूण तलाव व इतर ठिकाणीच असतात असा आरोप आमदार भोळे यांनी केला आहे.
ढिसाळ कामाचे ऑडिट कोण करणार ?
शहरात रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. मनपाने या कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी दोन मनपा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मात्र, या दोन्ही अधिकाऱ्यांना मनपा कर्मचारी, नगरसेवक व इतर ठेकेदारांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचीही तयारी केली होती. आता शहरातील रस्त्यांचा कामांबाबत आमदार भोळे यांनीच आक्षेप घेतल्यामुळे मनपाकडून होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण झाला आहे. मनपाकडून रस्त्यांचे ऑडिट करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही मनपाकडून याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.