मनपा भंगार बाजार ताब्यात घेणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:21 IST2021-09-15T04:21:07+5:302021-09-15T04:21:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील अजिंठा चौक परिसरातील भंगार बाजाराची मुदत संपून अनेक वर्षे झाली आहेत. हा बाजार ...

मनपा भंगार बाजार ताब्यात घेणार ?
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरातील अजिंठा चौक परिसरातील भंगार बाजाराची मुदत संपून अनेक वर्षे झाली आहेत. हा बाजार ताब्यात घेण्याबाबतचा ठराव काही महिन्यांपूर्वी महासभेत करण्यात आला होता. मात्र, हा ठराव केल्यानंतर देखील याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान, मनपा प्रशासनाने याबाबत या बाजारातील व्यावसायिकांची सुनावणी प्रक्रिया पूर्ण केली असून, भंगार बाजार ताब्यात घेण्याबाबत मनपा प्रशासनाकडून दोन दिवसांत आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे
भंगार बाजाराची मुदत संपून अनेक वर्षे झाली आहेत. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मनपा प्रशासनाने भंगार बाजारातील व्यावसायिकांची सुनावणी घेतली होती. त्यात काही जणांनी सुनावणीला प्रतिसाद दिला तर काहींनी या सुनावणीला हजेरी लावलेली नाही. त्यामुळे मनपाने ही सुनावणी प्रक्रिया आता आटोपती घेतली आहे. लवकरच याबाबत मनपा प्रशासन ‘ॲक्शन मोड’मध्ये येऊन कारवाई करण्याचा तयारीत आहे. कारवाई करण्याआधी मनपा प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाला देखील पत्र व्यवहार केला जाणार आहे. आदेश काढल्यानंतर गणेश विसर्जनानंतरच ही कारवाई करण्याची तयारी मनपा प्रशासनाने केली आहे.
बेसमेंटबाबत मात्र दुर्लक्ष कायम
मनपाकडून बेसमेंट पार्किंगसाठी परवानगी घेऊन त्याचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होत असल्याचा अनेक तक्रारी मनपाच्या नगररचना विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार नगररचना विभागाकडून शहरातील १०० हून अधिक हॉस्पिटलचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणांती शहरातील ६५ हॉस्पिटलमधील काही हॉस्पिटलमधील बेसमेंटमध्ये मेडिकल टाकण्यात आले आहे, तर काही हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी रूम काढण्यात आलेल्या आढळल्या आहेत. याबाबत मनपाने नोटीस बजावून सुनावणी देखील घेतली होती. मात्र, याप्रकरणी कोणतीही कारवाई या तीन वर्षांत करण्यात आलेली नाही.
लोकप्रतिनिधीही गप्पच
शहरातील कोणत्याही प्रश्नावर नेहमी महासभेत गदारोळ करणारे लोकप्रतिनिधी शहरातील बेसमेंटच्या प्रश्नावर मात्र बोलायला तयार नसल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे शहरात पार्किंगचा प्रश्न गंभीर होत जात असून, या प्रश्नामुळे सर्वसामान्यांसोबतच मनपातील पदाधिकाऱ्यांना देखील त्रास सहन होत आहे, तरीही बेसमेंटचा प्रश्न असो वा भंगार बाजार ताब्यात घेण्याचा प्रश्न यावर लोकप्रतिनिधींची चुप्पी तुटायला तयार नाही.