कोरोनाचा व्हायरसचा आघात शेतकऱ्यांच्या जिवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:18 IST2021-07-28T04:18:02+5:302021-07-28T04:18:02+5:30
आकाश नेवे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाभरात जानेवारी ते जून २०२१ या काळात ७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ...

कोरोनाचा व्हायरसचा आघात शेतकऱ्यांच्या जिवावर
आकाश नेवे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात जानेवारी ते जून २०२१ या काळात ७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या कुटुंबांनी याबाबत मदतीसाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रकरणे दाखल केली आहे. त्यातील ३५ शेतकऱ्यांची प्रकरणे पात्र ठरली आहेत; मात्र कोरोनामुळे मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे जून २०२० पासूनच आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. खरीप हंगाम हाती येण्याच्या काळात ऑक्टोबर २०२० मध्येच तब्बल २३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.
मार्च महिन्यात पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर झाले. त्यावेळी एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये जिल्ह्यात नापिकी आणि कर्ज यामुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण कमी होते; मात्र नंतर जसजसा लॉकडाऊनचा फटका शेतकरी आणि सर्व वर्गांना बसला, त्यानंतर दर महिन्याला होणाऱ्या शेतकरी आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या हातात खरीप हंगाम येतो; मात्र त्याच काळात ऑक्टोबर २०२० मध्ये २३ प्रकरणांची नोंद आहे. त्यातील १६ जण मदतीसाठी पात्र ठरले आहेत.
कर्ज आणि नापिकीने आत्महत्येचे प्रमाण जास्त
जिल्ह्यात बहुतांश शेतकरी पेरणी, शेताची मशागत आणि इतर कारणांसाठी कर्ज काढतात. हे पैसे खरीप हंगामातील उत्पन्नावर फेडले जाईल, अशी त्यांना आशा असते ;मात्र अपेक्षित उत्पन्न हाती येत नाही. सलग दोन किंवा तीन वर्षे हे सुरू राहिल्यावर ती व्यक्ती खचते.
जुलै ते ऑक्टोबरमध्ये वाढल्या आत्महत्या
२०२० च्या आकडेवारीनुसार जुलैमध्ये १८, ऑगस्ट १८, सप्टेंबर १३, ऑक्टोबर २३ अशी नोंद प्रशासनाकडे आहे. मार्च महिन्यापासून पीक कर्ज प्रकरणांना सुरुवात केली जाते. तसेच याच काळात आधीच्या कर्जांची परतफेडदेखील केली जाते, तसेच सप्टेंबर नंतर शेतकऱ्यांना शेतात किती पिकेल, याला अंदाज येतो. आपला अंदाज चुकला किंवा अपेक्षित भाव न मिळणे या कारणांमुळेदेखील शेतकरी आत्महत्या करतात.
ग्राफ
शेतकरी आत्महत्या प्रकरणे
२०२० - १४१
२०२१ - ७०
या महिन्यात वाढल्या आत्महत्या
२०२०
जुलै १८
ऑगस्ट १८
ऑक्टोबर २३
डिसेंबर १४
२०२१
फेब्रुवारी १४
जून १४