लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी प्रशासनाने कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची व्यवस्था केली आहे. तर अनेक रुग्णांना गृह विलगीकरणाची व्यवस्थादेखील महापालिका प्रशासनाकडे करण्यात येते. मात्र गृह विलगीकरणाची प्रक्रिया अतिशय किचकट असल्याने, आता गृह विलगीकरण कोरोनावाढीसाठी कारणीभूत ठरत आहे. गृह विलगीकरणासाठी लागणाऱ्या स्वाक्षऱ्यांसाठी संबंधित रुग्णाला प्रभाग कार्यालयापासून ते अभियंत्यांच्या ऑफिसपर्यंत चकरा माराव्या लागत असल्याने कोरोनाचा प्रसार हा अतिशय वेगाने होत आहे.
महापालिका प्रशासनाने कमी लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना गृह विलगीकरणाची सोय करून दिली आहे. यामुळे महापालिका प्रशासनावरील ताणदेखील काही प्रमाणात कमी होतो. मात्र, या प्रक्रियेसाठी मोठी किचकट कार्यवाही असल्याने कोरोनाचा फैलावदेखील अतिशय वेगाने होत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे. जर ही प्रक्रिया अशाच प्रकारे कायम राहिली तर शहरात वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर कोणताही परिणाम न होता कायम वाढतच राहील अशीच भीती व्यक्त केली जात आहे.
काय आहे गृह विलगीकरणाची प्रक्रिया?
एखाद्या रुग्णाने महापालिकेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील तपासणी सेंटरमध्ये कोरोनाची तपासणी केल्यानंतर, अहवाल पॉझिटिव्ह आला तर संबंधित रुग्णाला मनपाच्या कोरोना सेंटरमध्ये भरती करण्यात येते. तसेच संबंधित रुग्णाला कमी लक्षणे असली तर त्या रुग्णाला गृह विलगीकरणाची सूट देण्यात आली आहे. यासाठी रुग्णाला महापालिकेकडून मिळणारा एक अर्ज भरावा लागतो. त्यात आपल्या फॅमिली डॉक्टरची स्वाक्षरी घेऊन, अभियंता यांची स्वाक्षरी घ्यावे लागते. त्यानंतर संबंधित भागातील प्रभाग अधिकाऱ्याची स्वाक्षरी या अर्जावर घेऊन. मनपाने परवानगी दिल्यास संबंधित रुग्ण गृह विलगीकरणात राहू शकतो. ही सोय संबंधित रुग्णाला व महापालिकेलादेखील फायद्याची आहे. मात्र किचकट प्रक्रियेमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
यामुळे येणाऱ्या अडचणी
मनपाच्या तपासणी सेंटरवर संबंधित रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर गृह विलगीकरणाचा अर्ज घेतो. संबंधित रुग्णासोबत जर कोणताही व्यक्ती नसेल, तर तोच रुग्ण स्वतः फॅमिली डॉक्टरकडे जाऊन डॉक्टरची स्वाक्षरी घेतो. तोच रुग्ण मनपाच्या अभियंत्याकडे जाऊन त्यांची स्वाक्षरी घेतो. अभियंत्याची स्वाक्षरी घेतल्यानंतर प्रभाग समिती कार्यालयात जाऊन प्रभाग अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेतो. संबंधित रुग्ण पॉझिटिव्ह असतानादेखील केवळ स्वाक्षरीसाठी चार ठिकाणी चक्कर मारतो. यामुळे संबंधित रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या अनेकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता निर्माण होत असते.
एक खिडकी योजना यावर ठरू शकते फायद्याची
गृह विलगीकरणासाठी महापालिका प्रशासनाने जर कोरोना तपासणी सेंटरवरच एक खिडकी योजना सुरू केली, तर त्याच ठिकाणी संबंधित रुग्णाला सर्व आवश्यक स्वाक्षऱ्या मिळू शकतात. यामुळे संबंधित रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांची संख्यादेखील कमी होईल व कोरोनाचा वाढत जाणारा फैलावदेखील कमी करण्यात महापालिका प्रशासनाला काही प्रमाणात यश मिळू शकते.
कोट..
गृह विलगीकरणासाठीची प्रक्रिया किचकट असल्याने मनपा प्रशासनाला याआधीच अभियांत्रिकी महाविद्यालयात एक खिडकी योजना सुरू करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र अद्यापही महापालिका प्रशासनाने ही योजना सुरू केलेली नाही. सर्व प्रकारच्या स्वाक्षऱ्या एकाच ठिकाणी मिळतील यासाठी पुन्हा मनपा प्रशासनाला सूचना देण्यात येतील. सद्य:स्थितीत सुरू असलेल्या प्रक्रियेमुळे कोरोनाचा फैलाव वाढण्याची शक्यता आहे.
- जयश्री महाजन, महापौर